Pune Metro : पुणे मेट्रोच्या बुधवार पेठेतील भूमिगत बोगद्याचे काम पूर्ण

एमपीसी न्यूज : आज 4 जून 2022 रोजी पुणे मेट्रो (Pune Metro) प्रकल्पाच्या स्वारगेट ते बुधवार पेठ या भूमिगत मार्गाच्या बोगद्याच्या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण होत आहे. TBM मुळा-2 ने बुधवार पेठ मेट्रो स्थानकावर ब्रेक थ्रू करण्यात यश मिळवले. 5 सप्टेंबर 2021 रोजी स्वारगेट पासून सुरु झालेले खोदकाम मंडई स्थानक ओलांडून बुधवार पेठ येथे 2.025 किमी बोगदा तयार करून अंदाजे 10 महिन्यांत पूर्ण होत आहे. पुणे मेट्रोने गाठलेला हा टप्पा म्हणजे एकूण 12 किमी लांबीच्या भूमिगत बोगद्याचे 100% काम पूर्ण झाले आहे.
पुणे मेट्रोला एकूण 33.2 किमी लांबीचे दोन कॉरिडॉर आहेत. एक वनाज ते रामवाडी जी एक उन्नत लाईन आहे आणि दुसरी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट जी पिंपरी-चिंचवड ते कृषी महाविद्यालय पर्यंत उन्नत आहे आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत आहे. भूमिगत विभाग सुमारे 6 किमी आहे आणि या भागामध्ये शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानके आहेत.

भूमिगत (Pune Metro) विभागात अप आणि डाऊन मेट्रो ट्रेनसाठी दोन समांतर बोगद्यांचा समावेश आहे. 6 किमी बोगद्याच्या कामासाठी तीन टीबीएम वापरण्यात आले. या टनेल बोअरिंग मशिन्सना (टीबीएम) पुण्यातील नद्यांची नावे देण्यात आली आहेत. मुळा, मुठा आणि पवना इ.

पुणे मेट्रो प्रकल्पाचा भुयारी भाग हा अत्यंत आव्हानात्मक आणि महत्त्वाचा भाग आहे. पुणे मेट्रोसाठी भूमिगत काम करणारा कंत्राटदार M/s Tata-Gulermark ने प्रशंसनीय काम केले आहे. तांत्रिक कौशल्य आणि ठोस प्रकल्प व्यवस्थापनामुळे बोगद्याचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाले आहे. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे ट्रॅक, सिग्नलिंग आणि ट्रॅक्शनच्या कामासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.