Pune News: Pune News: गजा मारणे टोळीतील गुंड रुपेश मारणे वर्षभरासाठी स्थानबद्ध; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 50 जण स्थानबद्ध

एमपीसी न्यूज: कुख्यात गजा मारणे टोळीतील सराईत गुंड रुपेश मारणे (वय 38) याच्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणे त्याने पुणे मुंबई महामार्गावरून रॅली काढली होती. या रॅलीचा मास्टरमाइंड रुपेश मारणे असल्याचे सांगितले जाते. 

रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदारांवर कोथरूड, वारजे माळवाडी, स्वारगेट, दौंड, तळेगाव दाभाडे आणि समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. लोखंडी रॉड, कोयता, तलवार, लाकडी बांबू यासारखी घातक हत्याही बाळगून खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, दंगा, सरकारी कामात अडथळा आणणे यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर आहेत. मागील अठरा वर्षात त्याच्या विरोधात नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे कोथरूड परिसरात त्याची दहशत होती.
दरम्यान कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी रुपेश मारणे त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पाठवला होता. पोलिस आयुक्तांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्याला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. मागील वर्षभरापासून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 50 गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.