Pune News: भाजपकडून तपास यंत्रणांचा वापर चुकीच्या पद्धतीने – छगन भुजबळ

एमपीसी न्यूज: मागील १५ दिवसांच्या गोष्टी पाहिल्या तर भारत सरकारच्या तपास यंत्रणा ज्या पद्धतीने भाजप विरोधी सरकारं जिथं आहेत तिथं तिथं अतिरेक करत आहेत. त्यामुळेच या सर्व गोष्टी बाहेर यायला लागल्या आहेत. केंद्रीय तपास संस्थांचे अधिकारी चुकीचं काम करत आहेत आणि जनतेला त्रास देत आहेत हे समोर येतंय.

समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत हे सिद्ध झालंय. त्यांचे निकाहनामे बाहेर आलेत. नवाब मलिकही मुस्लीम आहेत. या प्रकरणात हिंदू मुस्लीम असण्याचा काहीही संबंध नाही. भाजप सरकार महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर करत आहे. लोकांना त्रास देत आहे. हे सर्व उघड करण्याचं काम नवाब मलिक यांनी केलंय,” असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. पुण्यात ते एका कार्यक्रमा निमित्त आले होते.

“शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार लक्ष देतंय. मागे जे नुकसान झालं त्यावर १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर झालीय. त्याप्रमाणे हळूहळू त्याचं वाटप सूरू झालंय. शेतकरी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर हे महाराष्ट्राचे दैवत आहेत,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

छगन भुजबळ म्हणाले, “महाराष्ट्र जसा विमानतळ, गोद्या, जेट्टी, उद्योगधंदे, पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो बॉलिवूडसाठी जग प्रसिद्ध आहे. चित्रपट क्षेत्रात हॉलिवूडनंतर दुसऱ्या क्रमांकाचं काम बॉलिवूडचं आहे. या संपूर्ण बॉलिवूडलाच बदनाम करण्याचं काम सुरू आहे. तसेच बॉलिवूडच्या माध्यमातून महाराष्ट्राला देखील बदनाम केलं जातंय. तसं करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं जातंय. अशा प्रकारचे खोटे आणि चुकीचे आरोप हे अधिकारी कसे करत आहेत?

आरोप करणारेच लोक कसे चुकीचे आहेत हे आता सर्वांच्या समोर येतंय. त्यामुळेच भाजपविषयी जनतेच्या मनात राग निर्माण होतोय.”
छगन भुजबळ म्हणाले, “गुजरातमधील मुंद्रा बंदरावर ३० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले. ते कुणी आणले, कुठून आणले, का आणले याची काही चौकशी नाही. दुसरीकडे २ ग्रॅम सापडले, ५ ग्रॅम सापडले असं करत सर्वांचं लक्ष ३० हजार कोटीच्या ड्रग्जवरून हटवून महाराष्ट्रावर आणलं जात आहे. न्यायालयानं हे सर्व ऐकून निर्णय दिलाय. आता आर्यन खानला जामीन मिळाला आणि पकडणारा अधिकारी कायद्याविरोधी काम केल्यानं कोर्टकचेऱ्या करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.