Pune News: वैद्यकीय उपचारांसाठी मनपा सेवक आणि कुटुंबीयांना पूर्ण सवलत

एमपीसी न्यूज – अंशदायी वैद्यकीय सहाय्य उपचार योजनेअंतर्गत महापालिका सेवक आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी 100 टक्के सवलत देण्यात यावी असा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘कोरोनाच्या काळात महापालिकेचे सेवक फ्रंटलाइन वर्कर म्हणून कार्यरत आहेत. अनेक सेवकांना कोरोनाची लागण झाली. काही जणांना प्राण गमवावे लागले. कोरोनामुळे सेवकांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली आहे. अंशदायी वैद्यकीय सहाय्य उपचार योजनेअंतर्गत उपचारांसाठी 90 टक्के अनुदान देण्यात येत होते. ते वाढवून 100 टक्के करण्यात आले आहे. महिला आणि बालकल्याण समितीने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता.’

महापालिका शाळेतील इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवत्ताप्राप्त पहिल्या पाच विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

रासने म्हणाले, ‘महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यामुळे हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी या वर्षी दहावी आणि बारावीतील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. या आशयाचा ठराव महिला बालकल्याण समितीने मान्यतेसाठी स्थायी समितीकडे पाठविला होता, असे रासने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.