आता पालिकेच्या वाहन दुरुस्ती विभागाचे खासगीकरण
एमपीसी न्यूज : महापालिकेच्या आरोग्य विभागात पीपीपी तत्त्वावर खासगीकरणाचा शिरकाव झाला असतानाच आता महापालिकेच्या घनकचरा विभागाकडील वाहन दुरुस्ती विभाग, कर्मशाळा विभाग, हडपसर कचरा रॅम्प येथील वाहन दुरुस्ती यांचेदेखील खासगीकरण करण्याचा प्रस्ताव तयार आहे. यावर लवकरच कार्यवाही करण्यात येणार असली तरी या खासगीकरणाला महापालिका कामगार युनियनने तीव्र विरोध केला आहे. हे खासगीकरण होऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पालिकेच्या घनकचरा विभागाकडे वाहन दुरुस्ती विभाग असून, महापालिकेची कचरा वाहतूक करणारी वाहने तसेच महापालिकेच्या विविध वाहनांची दुरुस्तीही या विभागाकडूनच होते. या विभागाचे मुख्य वाहन देखभाल दुरुस्तीचे काम ठेकेदारामार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. निविदा प्रक्रिया राबवून वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचे काम ठेकेदाराला देण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहन दुरुस्ती विभागाच्या खासगीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला यासंदर्भात प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या होता. यासाठी एक ठेकेदारसुध्दा निश्चित केला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या ठेकेदाराकडूनच सध्या महापालिकेला गाड्यांचा पुरवठा केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. |