Pune : दिल्लीत होणाऱ्या वर्ल्ड बुक फेअरशी स्पर्धा करण्याची पुण्यामध्ये क्षमता : राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पुणे पुस्तक महोत्सवाला अतिशय उत्तम प्रतिसाद (Pune)मिळत आहे. त्यामुळे पुण्यामध्ये दिल्लीत होणाऱ्या वर्ल्ड बुक फेअरशी स्पर्धा करण्याची क्षमता आहे, असे मत राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी मांडले.

देशात पहिल्यांदाच पुस्तकांच्या प्रचारासाठीचे धोरण राष्ट्रीय पुस्तक न्यास तयार करत असून, लवकरच हे धोरण जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्यसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव (Pune)आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने मिलिंद मराठे यांनी संवाद साधला. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, माधव भंडारी, अॅड. मंदार जोशी या वेळी उपस्थित होते.

 

Mahavitaran : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पश्चिम महाराष्ट्राची राज्यात आघाडी
मराठे म्हणाले, की प्रदर्शनातील पुस्तक संपल्याने सहभागी प्रकाशकांना दोनवेळा पुस्तके आणावी लागली आहेत. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाला मिळत असलेला प्रतिसाद फार चांगला आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे यंदा उज्जैन, शिलाँग, लडाख, गोमती येथे पुस्तक महोत्सव झाला.

तर संबलपूर, दिल्ली येथे पुस्तक महोत्सव होणार आहे. कर्नाटक, जम्मू काश्मीर येथूनही पुस्तक महोत्सव आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या पुस्तक महोत्सवांच्या तुलनेत पुण्यातील महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद प्रचंड मोठा आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या पुस्तकांची विक्रमी विक्री झाली आहे. पुण्याखालोखाल उज्जैन, शिलाँग येथेही चांगली विक्री झाली. सीमावर्ती राज्यातही महोत्सव आयोजित करत आहोत.

करोनानंतर पुस्तकांचे वाचनाचे प्रमाण वाढले. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा विद्यार्थी-पालकांना कळल्या. त्यामुळे विशेषतः लहान मुलांच्या पुस्तकांचा मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. ही वाढ ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत आहे. त्यात अॅक्टिव्हिटी बुक, अवांतर वाचनासाठी गोष्टींच्या पुस्तकांना मागणी असल्याचे निरीक्षण मराठे यांनी नोंदवले.

२०११मध्ये पुस्तक प्रचार धोरण तयार करण्यात आले होते. त्याचे पुढे काही झाले नव्हते. पण आता नव्याने धोरण तयार करण्यात येत आहे. ३० कोटी विद्यार्थ्यांनी किमान दोन पुस्तके वाचल्यास ६० कोटी पुस्तके वाचली जातील. तसेच केंद्राच्या योजनेनुसार गाव तिथे ग्रंथालय झाल्यास मोठ्या प्रमाणात पुस्तके लागणार आहेत. त्या अनुषंगाने पुस्तक प्रचार धोरण महत्त्वाचे ठरणार असल्याचे मराठे यांनी सांगितले.

प्रकाशनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण आतापर्यंत उपलब्ध नव्हते. प्रकाशनामध्ये आशय कळणे, पुस्तकांची निवडीसह आर्थिक व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन अशा अनेक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे ऑनलाइन अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे. या अभ्यासक्रमातील सहभागींना प्रत्यक्ष अनुभवासाठी एक महिन्याची इंटर्नशीपही उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता प्रकाशनाचा अभ्यासक्रम विद्यापीठांच्या सहाय्याने राबवण्याचा मानस आहे, असे मराठे म्हणाले.

सध्या राष्ट्रीय पुस्तक न्यास छापील पुस्तके तयार करते. मात्र डिजिटल माध्यमालाही असलेली मागणी लक्षात घेऊन येत्या काळात ऑडिओ-व्हिडिओ पुस्तकांची निर्मितीही राष्ट्रीय पुस्तक न्यासकडून करण्यात येणार आहे. त्यानुसार दिल्ली येथे होणाऱ्या वर्ल्ड बुक फेअरपर्यंत पाच ऑडिओ-व्हिडिओ पुस्तके तयार करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती मराठे यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.