Mahavitaran : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पश्चिम महाराष्ट्राची राज्यात आघाडी

एमपीसी न्यूज – महावितरणच्या वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत (Mahavitaran) पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल 1 लाख 72 हजार 450 पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला आहे. या वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिल्याने त्यांची तब्बल 2 कोटी 6 लाख 94 हजार रुपयांची वार्षिक बचत होत आहे. या योजनेत आतापर्यंत राज्यातील 4 लाख 35 हजार 902 वीजग्राहकांनी सहभाग घेतला आहे. यातील सर्वाधिक 39.6 टक्के ग्राहक पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. तर पुणे परिमंडलातील 1 लाख 15 हजार 435 ग्राहक राज्यात सर्वाधिक संख्येने या योजनेत सहभागी झाले आहेत.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाइनद्वारे लगेचच बिल भरणा करणे आणखी सोपे झाले आहे.

Pune : शेवटच्या क्षणातील गोलाच्या जोरावर भारतीय फूड कॉर्पोरेशन उपांत्यपूर्व फेरीत; इन्कम टॅक्स इलेव्हनची आगेकूच कायम

आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत ‘गो-ग्रीन’ योजना पर्यावरण रक्षणासाठी देखील महत्वाची आहे. कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल ॲप व (Mahavitaran) वेबसाईटवर ग्राहकांसाठी चालू व मागील वीजबिल तसेच वीजबिल भरल्याचा पावत्या आदींची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे ‘गो-ग्रीन’ योजनेत सर्व लघुदाब ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे जिल्ह्यात 1 लाख 23 हजार 396 ग्राहक सहभागी झाले आहेत त्यांची 1 कोटी 48 लाख 7 हजार 520 रुपयांची वार्षिक बचत होत आहे. तर या योजनेत सहभागी सातारा जिल्ह्यातील 11 हजार 525 ग्राहकांचे 13 लाख 83 हजार रुपये, सोलापूर जिल्ह्यातील 12 हजार 197 ग्राहकांचे 14 लाख 63 हजार 640 रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील 15 हजार 457 ग्राहकांचे 18 लाख 54 हजार 840 रुपये आणि सांगली जिल्ह्यातील 9 हजार 875 ग्राहकांच्या 11 लाख 85 हजार रुपयांची वीजबिलात वार्षिक बचत होत आहे.

वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील 11 महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.