Pimpri : सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे (Pimpri) यावर्षीही गिर्यारोहण प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, दुर्गभ्रमंती मोहिम असे विविध उपक्रम राबविण्यात आले. संस्थेचे संस्थापक कै. रमेश गुळवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी ‘रमेश गुळवे स्मृती सामाजिक पुनरुत्थान उपक्रम’ (RMARC) वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर राबविण्यात येतो. संस्थेचा “आरमार्क” या अभिनव उपक्रमाच्या अंतर्गत जुन्नर तालुक्यातील किल्ले चावंड, येथील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी समाज प्रबोधनपर व्याख्यान, ग्रंथदान व दुर्गभ्रमंती मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली, अशी माहिती आरमार्क उपक्रम समन्वयक सुमित दाभाडे यांनी दिली.

सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून दहा वर्षे गिर्यारोहण क्षेत्रामध्ये कार्य व विविध मोहिमांच्या बरोबरच सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून संस्थेचे संस्थापक दिवंगत रमेश गुळवे यांच्या स्मरणार्थ विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षी दोन दिवसीय उपक्रमाच्या माध्यमातून 16 डिसेंबर रोजी किल्ले चावंड येथे सागरमाथाचे सदस्य व जुन्नर येथील श्री शिव छत्रपती कॉलेज ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या 25 विद्यार्थ्यांसह श्रमदान व स्वच्छता अभियान पुर्ण करण्यात आले. यासाठी दुर्ग संवर्धक विनायक खोत व अमोल ढोबळे यांचे सहकार्य लाभले.

याच दिवशी स्थानिक ग्रामस्थांसाठी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत अरूण बोऱ्हाडे यांचे ‘व्यसनमुक्ती व युवकांसाठी नव्या संधी’ याविषयी समाजप्रबोधनपर व्याख्यान झाले. युवकांसाठी नव्या जगातील विविध संधी व व्यक्तिमत्त्व विकास याबरोबरच व्यसनमुक्ती या विषयावर अरूण बोऱ्हाडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

17 डिसेंबर रोजी सकाळी सह्याद्रीच्या दुर्गम आदिवासी गावांतील शालेय विद्यार्थ्यांना ग्रंथदान करण्याचा अभिनव उपक्रम अर्थात ग्रंथदिंडी सोहळा साजरा करण्यात आला.

शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांची आवड निर्माण व्हावी, सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर भटकंतीची गोडी लागावी, त्यांची निसर्गाशी मैत्री व्हावी आणि ऐतिहासिक गडदुर्गांची जपणूक व्हावी, यासाठी सागरमाथा गिर्यारोहण संस्था गेली अनेक (Pimpri) वर्षे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे गडदुर्गांच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी ग्रंथदिंडी काढून विविध प्रकारची वाचनीय पुस्तके त्यांना वाटण्यात येतात. गडकिल्ले पहायला जाताना सह्याद्रीच्या कुशीतील या रानपाखरांची गरज लक्षात घेऊन, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संस्थेने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. गेली दहा वर्षे पुणे जिल्ह्यातील पुरंदर, घनगड, हडसरगड, निमगिरी, सिंदोळा, इत्यादी किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावांतील रानपाखरांना अर्थात छोट्या विद्यार्थ्यांना अशी हजारो पुस्तके या संस्थेने आतापावेतो वाटली आहेत.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षणासह कला, साहित्य, संस्कृतीसाठी विशेष प्राधान्य दिले होते. त्यांची स्मृती म्हणून या उपक्रमास ‘यशवंत ग्रंथदिंडी’ असे नामाभिधान देण्यात आले होते. मुलांसाठी उपयुक्त माहिती, संस्कार, ज्ञान, विज्ञान, कथा अशी वाचनीय पुस्तके या ग्रंथदिंडी च्या माध्यमातून देण्यात आली. किल्ल्याच्या पायथ्याच्या दुर्गम गावातील शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन, तेथील गावकऱ्यांच्या सहकार्याने गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. अनेक दुर्गप्रेमी मान्यवर त्यामध्ये सहभागी झाले होते. एका शानदार समारंभात पुस्तक वाचनाचे महत्त्व पटवून देऊन, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ही पुस्तके शाळेकडे प्रदान करण्यात आली . शालेय पुस्तकांशिवाय अवांतर ज्ञानाची कवाडे उघडण्याचा हा आगळावेगळा प्रयत्न सागरमाथा गिर्यारोहण संस्था करीत आहे.

Chikhali : चिखली आहेरवाडी येथील खंडोबा मंदिरात श्री खंडोबा महाराजांचा चंपाषष्ठी उत्सव हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा

यानंतर दुर्गमहर्षी प्रमोद मांडे स्मृती दुर्गभ्रमंती मोहिम चावंड उर्फ प्रसन्नगड किल्ल्याच्या पायथ्यापासून सुरू झाली. या उपक्रमात श्री शिव छत्रपती कॉलेज जुन्नर च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच दिघी येथील रामचंद्र गायकवाड विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने गिर्यारोहक सहभागी झाले. या मोहिमेत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक ब. हि. चिंचवडे, दुर्ग अभ्यासक निलेश गावडे, डॉ संग्राम इंदोरे, तसेच दुर्ग संवर्धक विनायक खोत यांनी गडाचे ऐतिहासिक महत्त्व, भौगोलिक रचना आणि स्थापत्य विषयक माहिती सांगितली.

या दोन दिवसीय उपक्रमासाठी चावंडच्या सरपंच सुमनताई लांडे, मुख्याध्यापिका सुरेखा बोचरे, पंढरीनाथ लांडे, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे, सुभाष कुचिक, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. संदीप खिलारे, प्राचार्य विनोद वाळके सर, नारद गुळवे, नीळकंठ लोंढे, गडकिल्ले सेवा संस्थेचे अजय सोनवणे आदी मान्यवर सहभागी झाले होते.

सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने संस्थेचे कार्याध्यक्ष संयोजक एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्यासह उपक्रम समन्वयक म्हणून गजेंद्र बटवाल व सुमित दाभाडे होते. संस्थेचे अध्यक्ष प्रविण हरपळे व प्रशांत पवार यांनी मार्गदर्शन केले.

सागरमाथाचे प्रकाश ढमाले, पांडुरंग शिंदे, लखन घाडगे, ऋषीकेश देवकर, संकेत घुले, राजेश जाधव, शरद पवळे, संतोष फुगे, हर्षल खडके, प्रविण अडसुळ, सोमदत्त काळभोर, सौ. शुभदा तापकीर, कामेश जाधव, पृथ्वीराज बोऱ्हाडे इत्यादींनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.