Pune : मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या कामासाठी हाँगकाँगच्या कंपनीकडून दोन टनेल बोरिंग मशीन येणार

एमपीसी न्यूज- भूमिगत मेट्रोच्या खोदाईसाठी चार टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येणार असून त्यापैकी दोन मशीन हाँगकाँग स्थित कंपनीकडून मागवण्यात आल्या आहेत. या मशीन जहाजांमधून ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये दाखल होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून मेट्रोच्या भूमिगत मार्गिकेच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या 11.5 किलो मीटरच्या मार्गात 5 किलोमीटर मार्ग हा भूमिगत आहे. शहराच्या अत्यंत दाट लोकवस्ती आणि व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाच्या ठिकाणांना या भुयारी मेट्रो मार्गाद्वारे जोडले जाणार आहे. या मार्गिकेमध्ये शिवाजीनगर बसस्थानक, शिवाजीनगर सत्र न्यायालय, फडके हौद, मंडई आणि स्वारगेट ही पाच भूमिगत स्थानके आहेत. त्यापैकी फडके हौद चौकातील स्थानक बदलण्यात आले असून ते महापालिकेच्या दादोजी कोंडदेव शाळेजवळ प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना दळणवळणाचा एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.

भुयारी मार्गाचे काम अत्यंत किचकट, खर्चिक आणि जोखमीचे असल्यामुळे या कामांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय झाला असून पाच किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गासाठी चार टनेल बोरिंग मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यापैकी दोन टनेल बोअरिंग यंत्रणा टेरा टेक या हाँगकाँगस्थिती कंपनीकडून घेण्यात येणार आहेत. त्यानुसार ही यंत्रे जहाजाद्वारे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दाखल होणार आहेत. कृषी महाविद्यालय आणि स्वारगेट येथील शाफ्टमध्ये टनेल बोअरिंग मशीन उतरविण्यात येईल, त्याची जुळणी केली जाईल. त्यानंतर डिसेंबरपासून भुयारी मार्गाच्या कामांना प्रारंभ होणार आहे.

या प्रकारच्या यंत्रांचा वापर दिल्ली आणि मुंबई मेट्रो कामांसाठी करण्यात आला आहे. यंत्राचा व्यास 6.65 मीटर असून लांबी 120 मीटर आहे. टीबीएमद्वारे तुकडे केलेले दगड भुयाराच्या बाहेर आणले जातात आणि ते रस्ते किंवा सिमेंट काँक्रिटमध्ये वापरले जाऊ शकतात. भुयार करताना पाण्याच्या स्रोतांचा या यंत्रणेवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.