Pune News : राज ठाकरेंकडून दीड तासात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी

एमपीसी न्यूज : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवार पासून पुणे दौऱ्यावर आहेत. आपल्या पुणे दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. तर रात्री उशिरा त्यांनी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरी या पुस्तकाच्या दुकानाला भेट दिली होती. या दुकानात त्यांनी तब्बल दीड तास घालवत पन्नास हजार रुपयांच्या पुस्तकांची खरेदी केली आहे. 

राज ठाकरे यांनी अक्षरधारा बुक गॅलरी या दुकानात निवांतपणे बसून अनेक पुस्तके चाळली. त्यानंतर थोडीथोडकी नाही तर तब्बल 50 हजार रुपयांची पुस्तकं त्यांनी विकत घेतली. अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर म्हणाले, राज ठाकरे यांनी बुक गॅलरीला भेट देऊन जवळपास दीड तास त्यांनी सर्व विषयांची पुस्तके पाहिली. प्रामुख्याने ऐतिहासिक पुस्तके त्यांनी मोठ्या प्रमाणात घेतली.

सामाजिक विषयावरील, चरित्र-आत्मचरित्र, कलाविषयक प्रकारातली पुस्तके त्यांनी खरेदी केली. 50 हजार रुपयाहून अधिक पुस्तकांची त्यांनी खरेदी केली. यामध्ये दोनशेहून अधिक ग्रंथांचा समावेश आहे. इतिहासकार सरददेसाई यांचं मराठी रियासत, वा सी बेंद्रे यांचा संपूर्ण संच यांच्या ग्रंथांचा त्यांच्या खरेदीत समावेश होता.

दरम्यान मंगळवारी पुस्तके खरेदी करण्यासाठी आलेले राज ठाकरे माध्यमांवर संतापलेले पाहायला मिळालं. राज ठाकरे जिथे जिथे जातात तिथे माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्या मागावर असतात. आज देखील आपल्या मागावर माध्यमांचे प्रतिनिधी असल्याचे पाहून राज ठाकरे गाडीतुन उतरल्यानंतर थेट माध्यमांच्या दिशेने आले. आणि जगू द्याल की नाही असा प्रश्न विचारत माध्यमांना फटकारलं. कॅमेरेही बंद करण्यास भाग पाडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.