Moshi News : नियमबाह्य काम न केल्याने आरटीओ कार्यालयातील कर्मचा-यास धक्काबुक्की

एमपीसी न्यूज : शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी कागदपत्र छाननीच्या वेळी उमेदवारांना रांगेत न घेता थेट प्रवेश न दिल्याने आरटीओ कार्यालयात काम करणा-या कर्मचा-याला एकाने धक्काबुक्की केली. तसेच कार्यालयातील दरवाजे जोरजोरात वाजवून, आरडाओरडा करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना शनिवारी (दि. 13) मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथे घडली.

बबन दत्तात्रय मिसाळ (रा. मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत प्रसाद प्रभाकर पवार (वय 34, रा. चिखली प्राधिकरण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे मोशी येथील आरटीओ कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्याचे काम करतात. शनिवारी त्यांचे काम सुरु असताना शिकाऊ अनुज्ञप्ती घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांना नियम लावू नये. कागदपत्र छाननीच्या वेळी रांगेमधून न घेता थेट प्रवेश द्यावा, यासाठी आरोपी बबन मिसाळ याने फिर्यादी पवार यांना मोबाईलवरून धमकी दिली.

त्यानंतर दुपारी आरटीओ कार्यालयात येऊन पवार यांच्याशी हुज्जत घालून त्यांच्या हातातील पेन हिसकावून घेत खुर्चीवरून ओढून धक्काबुक्की केली. शिकाऊ अनुज्ञप्तीची संगणकीय चाचणी सुरु असताना हॉलचा दरवाजा जोरजोरात वाजवून तसेच आरडाओरडा करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.