Hinjawadi News : विठ्ठल शेलारच्या धमकीनंतर शरद मोहोळ टोळीचा राधा चौकात राडा;

एमपीसी न्यूज – विठ्ठल शेलार याने सिद्धेश हगवणे याला त्याच्या घराजवळ जाऊन धमकी दिल्यानंतर शरद मोहोळ टोळीच्या सदस्यांनी विरोधक विठ्ठल शेलार समजून एका गाडीवर दगड व कुंड्या फेकून मारून हल्ला केला. राधा चौक, म्हाळुंगे येथे रस्त्यावर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. हा प्रकार दि. 8 जानेवारी रोजी मध्यरात्री सव्वाबारा ते एक वाजताच्या कालावधीत घडला.

शरद हिरामण मोहोळ (रा. माऊलीनगर, सतारदरा, कोथरूड), आलोक शिवाजी भालेराव (रा. वडाची वाडी, पौड रोड, कोथरूड), मल्हारी मसुगडे (रा. माळवाडी, पुनावळे), सिद्धेश बाहू हगवणे (वय 30, रा. म्हाळुंगे, पुणे) आणि पाच ते सहा अनोळखी इसम (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल शेलार याने व्यावसायिक वादातून सिद्धेश हगवणे याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली. सिद्धेश हगवणे हा शरद मोहोळ टोळीतील सदस्य आहे. त्याने शरद मोहोळ याच्या सांगण्यावरून सिद्धेश हगवणे, मल्हारी मसुगडे, आलोक भालेराव यांनी विठ्ठल शेलार आणि त्याचे सहकारी समजून एका कारमधून जाणा-या साथीदारांवर दगड आणि कुंड्या फेकून मारत गंभीर हल्ला केला. तसेच राधा होते व तिथून येणा-या जाणा-या लोकांच्या जीवाची पर्वा न करता सार्वजनिक रस्त्यावर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या. आरोपींनी लोकांमध्ये दशहत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.

यापूर्वी सिद्धेश हगवणे याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुंड विठ्ठल शेलार आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हगवणे हा बांधकाम साईटवर मटेरियल सप्लाय करण्याचा व्यवसाय करतो. दरम्यान त्याचा वाद विठ्ठल शेलार टोळीच्या एका सदस्याशी झाला. त्यामुळे विठ्ठल शेलार याने हगवणे याच्या घरासमोर जाऊन त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पिस्तूल दाखवत ‘उद्या तुझ्या अंत्यविधीसाठी नातेवाईक बोलावून ठेव’ अशी धमकी दिली.

शरद मोहोळ हा सुतारदरा, कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी शरद मोहोळ याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील संशयित दहशतवादी कातिल सिद्धीकीच्या खुनाचा आरोप मोहोळ याच्यावर करण्यात आला होता. मात्र पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका झाली आहे.

तर विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथील आहे. यापूर्वी तो पुणे शहरातील गणेश मारणे टोळीसाठी वसुली करत होता. मुळशी येथे दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारच्या दहशतीचा नवीन अध्याय सुरु झाला. पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्याने स्वतःचे नेटवर्क तयार केले. त्याच्यावर नऊ गंभीर गुन्हे दाखल असून सन 2014 मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

राधा चौकात या दोन्ही टोळ्या एकमेकांसमोर आल्या असल्याचे म्हटले जात आहे. यातूनचा पुन्हा शहरात टोळीयुद्ध होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.