Chinchwad News : अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी 28 गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज – अनधिकृतपणे, पालिकेची परवानगी न घेता बांधकाम केल्यास पालिकेकडून त्या बांधकामांवर कारवाई केली जाते. सुरुवातीला नोटीस देऊन बांधकाम काढायला सांगितले जाते. पालिकेने दिलेल्या मुदतीत बांधकाम न काढल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते.

बांधकाम पाडण्यासह गुन्हेही दाखल केले जात आहेत. गुरुवारी (दि. 3) पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध पोलीस ठाण्यात तब्बल 27 तर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून एक असे एकूण 28 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे पालिका ऍक्शन मूडमध्ये आल्याची चर्चा सुरू आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ठराविक उंचीचे बांधकाम करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. अनेकजण परवानगीची कटकट टाळण्यासाठी विनापरवाना बांधकाम करतात. अशी बांधकामे पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधितांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात येते.

गुरुवारी गुन्हे दाखल झालेल्या संबंधितांना देखील पालिकेने नोटीस बजावली होती. पालिकेने दिलेल्या वेळेत अनधिकृत केलेले बांधकाम काढून टाकण्यास पालिकेच्या नोटीसमध्ये सांगण्यात आले होते. मात्र आरोपींनी त्यांचे बांधकाम काढले नाही. याबाबत पालिकेकडून थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाकड पोलीस ठाण्यात 11 गुन्हे, पिंपरी पोलीस ठाण्यात 14 गुन्हे तर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 2 असे एकूण 27 गुन्हे महापालिकेकडून दाखल करण्यात आले आहेत. तर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून चिंचवड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईने मागील काही दिवसांपासून जोर धरला आहे. त्यामुळे शहरात पालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.