Pune District News: शिक्रापुरातून चंदन तस्कर जेरबंद

26 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज: पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर परिसरातून टेम्पोतून चंदनाची छुपी तस्करी करणाऱ्या एकाला जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून तब्बल 26 लाखाचे चंदन जप्त करण्यात आले. सूरज कैलास उबाळे ( वय 24 रा.चांदा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर) असे या तस्कराचे नाव आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला पुणे-अहमदनगर महामार्गावरून एका टेम्पोतून चंदनाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून शिक्रापूर चौकात हा टेम्पो थांबवला. आणि टेम्पोची पाहणी केली असता संपूर्ण टेम्पो रिकामा होता. परंतु पोलिसांनी पुन्हा एकदा पाहणी केली असता टेम्पोमध्ये खालच्या बाजूला एक स्वतंत्र कप्पा तयार करून त्यामध्ये चंदनाच्या दाव्याची लाकडे ठेवण्यात आली होती. या सर्व चंदनाची किंमत पंचवीस लाख 82 हजार 880 रुपये इतकी आहे.

पोलिसांनी चंदनाचा हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.