Sangvi: भल्या सकाळी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला सांगवी पोलिसांकडून अटक

Sangvi: A man who came to sell pistols in the early morning was arrested by Sangvi police काही वेळाने एक व्यक्ती कापडी पिशवी घेऊन संशयितरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

एमपीसी न्यूज- भल्या सकाळी सव्वा सातच्या सुमारास पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला सांगवी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई आज (दि.29) सकाळी विशालनगर येथे करण्यात आली आहे.

आरोपी विक्या घिसाडी उर्फ विकास बबन पवार (वय 48, रा. शिवशक्ती तरुण मंडळ, रेल्वे लाईन जवळ, दापोडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक कैलास पर्वतराव केंगले यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलीस नाईक रोहीदास बो-हाडे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती विशालनगर येथील चोंधे लॉन्स, नदीच्या पुलाजवळ पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला.

काही वेळाने एक व्यक्ती कापडी पिशवी घेऊन संशयितरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत काय आहे, असे विचारले असता त्याने पिशवी लपवून त्यात काहीही नसल्याचे पोलिसांना सांगितले.

तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी त्याची पिशवी तपासली असता त्यात एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

आरोपी विक्या याने तो गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी विक्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ ऊंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुंके, रोहीदास बोहाडे, कैलास केगले, सोमनाथ असवले, विनायक देवकर, शशिकांत देवकांत, अरुण नरळे, नितीन खोपकर, अनिल देवकर, दिपक पिसे, हेमंतकुमार गुत्तीकोंडा यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.