Sangvi Crime News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार हाताने मारहाण केली. तसेच घटस्फोट घेण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी सासरकडील चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 18 जून 2019 ते 28 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये कोळपेवाडी, जि. अहमदनगर आणि साईनाथ नगर, पिंपळे गुरव पुणे येथे घडली.

शशिकांत कोळपे, मच्छिंद्र कोळपे, किरण कोळपे, आणि महिला आरोपी (सर्व रा. मु. पो. कोळपेवाडी, ता. कोपरगाव जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मृत विवाहितेचा भाऊ याने सोमवारी (दि. 30) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचे लग्न आरोपी शशिकांत कोळपे यांच्याशी झाले. लग्नानंतर आरोपी शशिकांत फिर्यादी यांच्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला हाताने मारहाण करीत असे.

आरोपी मच्छिंद्र कोळपे आणि महिला आरोपी हे फिर्यादी यांना ‘तुझ्या बहिणीला घेऊन जा. आम्ही याचे दुसरे लग्न लावून देऊ. तुम्हाला साडेअकरा लाखांच्या पॅकेजचा नवरा दिला आहे. तो देखील संभाळता येत नाही. आम्ही एवढे श्रीमंत असून गरीबाची मुलगी केली’, असे वारंवार टोचून बोलत असे. तसेच घटस्फोट घेण्यासाठी आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांच्या बहिणीवर दबाव आणला. या त्रासाला कंटाळून तिने 28 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक के. एस. गवारी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.