Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 21 – अन्वर हुसेन

एमपीसी न्यूज : त्याचा आवाज जणू स्वर्गलोकातला होता. (Shapit Gandharva) त्याने एकदा गायलेलं गाणं ऐकून स्व. मोहम्मद रफीसाब इतके प्रभावित झाले होते की त्यांनी लगेचच सूतोवाच म्हणा वा भाकीत केले होते की, ‘माझा वारसा हा मुलगा नक्कीच सार्थपणे चालवेल’. इतका मोठा गायक आणि संपूर्ण रसिकांच्या लेखी मोहम्मद रफी म्हणजे एक अस्सल देवदूत. त्यांची भविष्यवाणी खोटी कशी ठरेल? त्याचे पदार्पणातले गाणे फारसे लोकप्रिय झाले नसले, तरी त्याची त्यानंतर आलेली दोन्हीही गाणी इतकी लोकप्रिय झाली की लोकांना वाटले- ‘रफी साहेबांची भविष्यवाणी सत्यात उतरली!’

पण, दुर्दैवाने त्याची कारकीर्द फार काही यशस्वी झाली नाही. त्याचा आवाज खरोखरच चांगला होता; पण चित्रपटसृष्टीत टिकून राहायचे असेल, तर अंगभूत कौशल्याइतकेच इथे सर्वाच्या सोबत राहण्याचे कसबही असायला हवे. कदाचित ते कमी पडले वा त्याचे कमनशीब असेल; पण तो जितका यशस्वी ठरायला हवा होता, तितका नक्कीच ठरला नाही.

‘हमसे का भूल हुवी, जो यह सजा हमका मिली’ या हिंदी  चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या सुपरस्टारवर (हे मी म्हणत नाही. हे म्हणणे आहे महानायक अमिताभ बच्चन यांचे) राजेश खन्नावर चित्रित झालेल्या गाण्याचे पार्श्वगायन करणारा गुणी पण कमनशिबी पार्श्वगायक अन्वर हुसेन उर्फ अन्वर म्हणजेच आपल्या लेखमालेतील आजचा ‘शापित गंधर्व’ (Shapit Gandharva 21)

1 फेब्रुवारी 1949 रोजी मुंबई येथे जन्म झालेल्या अन्वर हुसेन यांचे वडील आशिक हुसेन एक सुप्रसिद्ध सितारवादक होते. इतकेच नाही, तर त्यांनी सुप्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांच्या सोबत सहाय्यक म्हणूनही काम केले होते. त्यांनी सितारवादनासोबतच संवादिनी (हार्मोनियम) वादनातही खूप नाव कमावले होते. सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा सचदेव आणि अभिनेता अर्शद वारसी हे अन्वरचे सावत्र बहीण भाऊ.

साहजिकच अन्वरच्या घरातले वातावरण संगीतासाठी पोषक होते. त्याला उस्ताद अब्दुल रहेमान खान यांच्याकडे गायनाचे धडे गिरवण्यासाठी पाठवले होते. हे उस्ताद तेच होते, ज्यांनी सुप्रसिद्ध पार्श्वगायक महेंद्र कपूर यांनाही गायनाचे शास्त्रीय धडे दिले होते. एकंदरीतच अन्वर यांना परमेश्वराने पृथ्वितलावर पाठवतानाच डोक्यावर वरदहस्त ठेवला होता. त्यांना चित्रपटात पार्श्वगायन करण्यासाठी फारच लवकर संधी मिळाली.1973 साली आलेल्या ‘मेरे गरीब नवाज़’ या चित्रपटात ‘कसम हमें अपनी जान की’ हे गीत गाण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांचे वय फक्त 24 होते. ही संधी त्यांना दिली होती सुप्रसिद्ध संगीतकार कमाल राजस्थानी यांनी. त्यांनीच एकदा असे सांगितले होते की या गाण्याचे रेकॉर्डिंग चालू असताना कर्मधर्मसंयोगाने तिथे मोहम्मद रफी आले होते. हे गाणे रेकॉर्ड (Shapit Gandharva) होत असताना त्यांनी ते तिथे बसून ऐकले आणि ऐकल्या-ऐकल्या असे सांगितले की हा गायक माझा वारसा नक्कीच चालवेल.

दुर्दैवाने हे गाणे फारसे लोकप्रिय झाले नाही; पण अन्वरचे नशीब जोरावर होते. आणि त्याच नशिबाने त्यांना मिळवून दिला, सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता-दिग्दर्शक यांचा ‘जनता हवालदार’ हा चित्रपट, ज्याचा नायक होता सुपरस्टार राजेश खन्ना आणि यात कलाकार होते योगिताबाली, महमूद. संगीतकार होते राजेश रोशन. या चित्रपटात अन्वर यांनी दोन गाणी गायली होती. ‘तेरी आंँखों की चाहत में’ आणि ‘हमसे का भूल हुवी’ हीच ती लोकप्रिय गाणी, जी आजही कानाला अतिशय मधुर वाटतात. या गाण्यांनी अन्वरला प्रचंड यश मिळवून दिले. त्यानंतर त्यांनी पुढील काही वर्षे गाजवताना गानसरस्वती लता मंगेशकर, आशा भोसले अशा महान सहकलाकारांसोबत अनेक चित्रपटात लोकप्रिय गाणी गायली.

हाथों की चंद लकीरों का (विधाता)
जिंदगी इम्तिहान लेती है (नसीब)
सोनी मेरी सोनी सोनी (सोहनी महीवाल)
मोहब्बत अब तिजारत बन गयी है (अर्पण)

अशी अन् यासम अनेक अवीट आणि चिरकाल आठवणीत राहणारी असंख्य गाणी त्यांनी यादरम्यान गायली. रफी साहेबांचे भाकीत सत्यात उतरले आहे, असे त्यामुळे वाटायला लागले होते अन् नेमके याच क्षणी त्यांची गाडी रुळावरून खाली घसरली. हाच असतो दैवी खेळ. हेच असते प्राक्तन. तुम्ही काहीही नसताना ‘तो’ अचानक प्रसन्न होतो. काहीही न मागता कधीच ज्याची कल्पनाही केली नव्हती असे सुख भरभरून देतो.

अचानक झालेल्या या बदलामुळे मनात कितीही नाही म्हटले तरी एक माज/अहं येतोच. त्याचे आपल्यावर लक्ष असतेच. याच क्षणी तो हळूच एक झटका देतो, जो इतका मोठा असतो की तो सारे काही उद्ध्वस्त करतो. असेच काहीसे अन्वरच्या बाबतीत झाले. साक्षात मोहम्मद रफीने केलेले कौतुक, (Shapit Gandharva) मोठमोठ्या प्रस्थापित संगीतकार, गीतकार, गायिका यांच्यासोबत पार्श्वगायन- सगळे काही स्वप्नवतच होते. याची नशा नाही म्हटले तरी चढलीच. यशाची नशा ही दारूच्या नशेहूनही फार मोठी असते.

या यशाने अन्वरच्या डोक्यात हवा गेली. त्याने आपले मानधन अचानक इतके वाढवले की निर्मात्यांनी डोक्याला हातच लावला. याचा पहिला अनुभव विख्यात दिग्दर्शक स्व. मनमोहन देसाई यांना आला होता. ‘नसीब’ चित्रपटाचे शूटिंग चालू असताना अचानक अन्वर यांनी त्यांना जास्त मानधन मागितले. असेच काहीसे ‘द ग्रेट शोमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व.राज कपूर यांच्या बाबतही ‘प्रेमरोग’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडले. यात खरे खोटे काय ते त्यांना वा परमेश्वरालाच माहिती; पण यानंतर अन्वर यांची कारकीर्द काहीशी विस्कळीत झाली. त्यातच अनेक नव्या दमाचे गायक (शब्बीरकुमार,उदित नारायण, कुमार सानू) संधीचे दार ठोठावत होते, अन् अन्वर चित्रपट सोडून देश-विदेशात स्टेज शो करत होते.

चित्रपटसृष्टीचा अलिखित नियम हाच की इथे नमस्कार असतो तो फक्त चमत्काराला आणि उगवत्या सूर्यालाच. साहजिकच नवीन गायकांनी मिळालेल्या संधीचे सोने करताच अन्वरचा सर्वांना विसर पडायला लागला आणि बघता-बघता ते विस्मरणात गेले.

अशा रितीने त्यांच्या उज्ज्वल आणि एक मोठी होवू शकणाऱ्या कारकिर्दीचा अंत झाला!

आज मागे वळून पाहताना त्यांना आपल्या हातून कळत-नकळत घडलेल्या चुकांची जाणीव होत असेल का? खरोखरच असे घडले होते का? की केवळ उगाचच उठलेल्या वावड्यांनी त्यांचे करियर उद्ध्वस्त केले? अन्वर कधी तरी एकांती असे म्हणत असतील का? त्यांनीच गायलेल्या या ओळी.. हमसे का भूल हूवी जो ये सजा हमका मिली?

काहीही असो. परमेश्वराने त्यांच्या बाबतीत अन्याय केला वा (Shapit Gandharva) त्यांच्या ओठी इतकी अजरामर गाणी देऊन त्यांना उपकृत केले, त्याचे तोच जाणो. पण अन्वर हे नक्कीच एक उत्तम गायक होते. आज आता त्यांनी वयाची 70 री पार केली आहे. त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदी आणि सुखी- समाधानी जावो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना!

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.