Bhosari News : कारखान्यातून रस्त्यावर सोडलेले पाणी पिल्याने मेंढ्यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कारखान्यातून रस्त्यावर सोडलेले केमिकल मिश्रित पाणी पिल्याने आठ मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 7) सायंकाळी सहाच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे उघडकीस आली. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवा शिवाजी कोकरे (वय 26, रा. यवत) हे एमआयडीसी भोसरी येथून मेंढरे घेऊन जात होते. दरम्यान, जे- 470 येथील हेरोकाँर्ब हिट ट्रिटर्स येथील लोखंडी पार्ट बनवण्याच्या कारखान्यातून रस्त्यावर आलेले केमिकल मिश्रित पाणी त्यांच्या मेंढरांनी पिले. त्यामुळे काही वेळातच आठ मेंढरांचा तडफडून मृत्यू झाला.

याबाबत कोकरे यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच, रस्त्यावर आलेल्या केमिकल मिश्रित पाण्याचे नमुने घेतले. मेंढरांचे शवविच्छेदन झाल्यानंतर याप्रकरणातील दोषींवर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.