Shiv Sainiks Protest : आजी-माजी खासदारांविरोधात शिवसैनिकांचे आंदोलन; प्रमुख पदाधिका-यांची आंदोलनाकडे पाठ

एमपीसी न्यूज – मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेत बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. त्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी आज (शुक्रवारी) पिंपरीत (Shiv Sainiks Protest) आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, आजी आमदार, महिला संघटिका, सहसंपर्कप्रमुख, जिल्हा संघटिका, कार्यकाळ संपल्याने माजी झालेल्या सर्व नगरसेवकांनी आंदोलनाकडे पाठ फिरविली. केवळ 30 ते 35 शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, मंगला घुले आदी शिवसैनिक सहभागी झाले होते. उद्धवसाहेब, आदित्यसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. दरम्यान, तिरडी आंदोलन करण्यास पोलिसांनी नकार दिला.

 

 

शहरप्रमुख सचिन भोसले म्हणाले, ”तिरडी उचलून आंदोलन करणार होतो. त्यासाठी तिरडी आणली होती. परंतु, पोलीस बळावर दडपशाही केली जात आहे. पोलिसांनी तिरडी ताब्यात घेतली. पोलीस बळावर आंदोलन (Shiv Sainiks Protest)  दडपले जात आहे. शिवसैनिकांना चुकीच्या पद्धतीने पोलीस ठाण्यात डांबून ठेवले जात आहे. शिवसैनिकांमुळे हे खासदार, आमदार झाले आहेत. शिवसैनिकांनी घरदार सोडून प्रचार करुन यांना खासदार केले. आजी-माजी खासदारांना पक्षाने काय कमी दिले होते. त्याचे आत्मपरिक्षण त्यांनी करायला पाहिजे होते”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.