Shravan : ओळख मराठी महिन्यांची – सणांचा महिना श्रावण

एमपीसी न्यूज : हिंदू पंचांगातील पाचवा महिना (Shravan) श्रावण! श्रावण म्हटले, की आपल्याला बालकवींची, “श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे । क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे।।” ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही. या महिन्यात सृष्टी अगदी मोहरून गेलेली असते. सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. मन अगदी प्रसन्न असते. यावर्षी श्रावण महिन्यात अधिक मास होता म्हणून दोन श्रावण महिने आले आहेत. एक अधिक आणि दुसरा नीज. आजपासून नीज श्रावण सुरू झाला आहे.

या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात प्रवेश करतो म्हणून हा महिना श्रावण म्हणून ओळखला जातो. हा महिना सणसमारंभांनी युक्त असा महिना आहे. म्हणून याला सणांचा राजा असे म्हटले जाते.

रोजच्या दिवसाला काहीतरी महत्त्व असते. सोमवारी शंकराची आराधना, मंगळवारी मंगळागौर, बुधवारी बृहस्पती पूजन, गुरुवारी दत्त पूजा, शुक्रवारी जिवती पूजन, शनिवारी शनि आणि हनुमंताची पूजा व रविवारी आदित्य पूजन!

रोजच्या दिवसाची वेगळी कहाणी आहे. हा भगवान शिवशंकरांचा आवडता महिना म्हणून ओळखला जातो. रोज ‘ओम नमः शिवाय’चा जप करावा असे शास्त्रात सांगितले आहे.

नागपंचमी, कलकी जयंती, ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ असे म्हणत येणारा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण रक्षाबंधन किंवा ‘आज नारळी पुनवेला, चल गोमू समुंदरला’ असे म्हणत येणारा नारळी पौर्णिमेचा सण. कोळी बांधव भक्तीभावाने समुद्रात नारळ सोडून आपल्या रक्षणाची मागणी आपल्या लाडक्या समुद्राकडे करत असतात.

त्यानंतर येणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे कृष्णाष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. दुसऱ्या दिवशी दहीहंडी, गोपाळकाला. श्रावण महिन्यातील शेवटचा दिवसही महत्त्वाचा असतो पिठोरी अमावस्या. हा दिवस ‘मातृदिन’ म्हणूनही साजरा केला जातो. आई आपल्या मुलांची पूजा करून त्यांना ओवाळते. महाराष्ट्रातील शेतकरी बांधव बैलपोळा साजरा करून आपल्याला वर्षभर मदत करणाऱ्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात.

Pune : पुणे आरटीओची चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका

श्रावण महिन्यात उनसावलीचा खेळ सुरू असतो. ‘हासरा नाचरा, जरासा बावरा, श्रावण आला! म्हणत नववधू माहेरी यायला उत्सुक झालेल्या असतात. त्यांच्या मनात ‘आला श्रावण संगे पाऊस घेऊन, चिंब जाहले हे मन त्या सरीत भिजून।। ही कविता जणू फेर घालत असते.

‘श्रावणात सणांची दाटी ।नागपंचमी रक्षाबंधनाच्या गाठी ।। (Shravan)

असा हा श्रावण महिना आपल्या सर्वांना सुख समृद्धी व आनंद भरभराहट देण्याचा जाऊ दे अशीच प्रार्थना शिवशंकराकडे करते.

– रंजना बांदेकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.