Namdevrao Shelar : सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव शेलार यांचे निधन

एमपीसी न्यूज – कुस्तीपटू म्हणून (Namdevrao Shelar) नाव कमावलेले आणि पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव ज्ञानदेव शेलार (वय 81) यांचे रविवारी (11 सप्टेंबर) दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
महात्मा फुले यांचे सहकारी असलेल्या नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मरणार्थ ‘नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठान’ स्थापन करून त्या माध्यमातून शेलार यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. महाविद्यालयीन जीवनात ते कुस्तीपटू म्हणून नावाजले गेले होते. उज्जैन येथे 1967 मध्ये झालेल्या आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करून त्यांनी पहिला क्रमांक मिळवला. त्यांना चांदीची गदा सन्मानादाखल मिळाली होती. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे दिवंगत सचिव डॉ. विकास आबनावे यांनी प्रतिष्ठानच्या कार्यासाठी संस्थेतील जागा उपलब्ध करून दिली होती.
नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा (Namdevrao Shelar) परिचय करून देणे, त्यांच्या स्मरणार्थ काही कामगारांना पुरस्कार, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेणे असे अनेक उपक्रम शेलार यांनी राबवले होते. नारायण मेघाजी लोखंडे यांचे टपाल तिकीट केंद्राने प्रसारित करावे यासाठी त्यांनी निवेदने दिली होती. त्यामुळे 2005 साली तत्कालीन पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंग यांच्या हस्ते लोखंडे यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण झाले.
मुंबईतील लेबर इन्स्टिट्यूटला लोखंडे यांचे नाव द्यावे, अशीही त्यांनी मागणी करून तसे निवेदन राज्य सरकारला दिले होते. याच्या परिणामी, या संस्थेचे नावही लोखंडे यांच्या स्मरणार्थ दिले गेले. कामगारांच्या हक्कांसाठी लोखंडे यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन पिंपरी चिंचवडमधील उद्योग जगतात त्यांचे स्मरण व्हावे, असा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला होता. भारतातील कामगार चळवळीचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. त्यावर एक पुस्तकही लिहिण्याचे त्यांनी ठरवले होते. यासंदर्भात लोखंडे यांचे वारसदार आणि आप्तजनांशी त्यांनी संपर्कही साधलेला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.