Crime News : चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ मावळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेगाव दाभाडे – मावळ तालुक्यातील कोथूर्णे येथील सात वर्षांच्या मुलीचे मंगळवारी (दि.2) अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हृदयद्रावक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (वय 24, रा.कोथूर्णे ) बेड्या ठोकल्या.

 

 

माणुसकीला काळिमा फासणारे या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला असून अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसह मावळ तालुका बंदची हाक देण्यात आली होती.

 

पवनानगर, कामशेत, वडगावसह तळेगाव शहर व परिसरातील नागरिकांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निषेध व्यक्त केला.कामशेत शहरांमध्ये नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र येत चिमुकलिला श्रद्धांजली वाहिली. यावेळी विशाल जनसमुदाय उपस्थित होता. शहरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शांततेच्या मार्गाने मोर्चाचे आयोजन केले होते.

 

यावेळी नागरिकांनी नराधमाला फाशीची शिक्षा द्या यासाठी फास्टट्रॅक कोर्टमध्ये केस चालवा. तसेच यासाठी होणारा आर्थिक खर्च देण्यासाठी कामशेत व्यापारी असोसिएशन व नागरिकांनी एकमुखाने तयारी दर्शविली. यावेळी कामशेत शहर व परिसरामध्ये होणाऱ्या रोड रोमियोंना चाप बसण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना करणार असल्याचे सांगण्यात आले.

 

 

कामशेतला निषेध मोर्चा

 

कामशेत शहर व परिसरातील महिलांनी चिमुकलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी व नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी शहरातील पंडित नेहरू विद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा कॅण्डल मार्च काढला. दरम्यान, अटक आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी व त्याची आई सुजाता महिपती दळवी या दोघांना गुरुवारी (दि.04) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 

पवनानगरमध्ये सर्व पक्षीय आंदोलन

 

दरम्यान, या खूनातील आरोपीला कामशेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून नराधमाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी पवनानगरमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.

 

या वेळी पवनानगर बाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून तसेच सर्व आंदोलनकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त करत काळे झेंडे दाखवत घोषणा दिल्या. चिमुरडीला पंधरा दिवसाच्या आत न्याय मिळालाच पाहिजे, त्या नराधमाला फाशी दिली पाहिजे, अशा घोषणा देत हजारो आंदोलनकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला. शिवछत्रपतींच्या पावन भूमीत, संतांच्या भूमीत असे कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशीच व्हावी, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांसह आंदोलनकर्त्या मावळवासियांनी केली.

 

महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला अध्यक्षा उमा खापरे, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे,मनसे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक किशोर भेगडे, राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर नितीन घोटकुले, ज्ञानेश्वर दळवी, जितेंद्र बोत्रे, सायली बोत्रे, सीमा ठाकर, खंडू कालेकर, मुकुंद ठाकर, अमित कुभार, महादू कालेकर, विश्वनाथ जाधव, संजय मोहळ, सजन बोहरा, संदीप भुतडा, विकास कालेकर, माऊली आढाव, राहुल मोहळ आदी नागरिकांसह महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.