Mumbai News : जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्याची शासनाची तयारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

एमपीसी न्यूज – राज्यातील जनतेच्या हिताच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून त्या सोडवण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री सतेज पाटील, संजय बनसोडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरविल्यानुसार दि. 3 ते 25 मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यात आले असून येत्या 11 मार्च रोजी राज्याचा 2022-23 चा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. सर्व बाबी नियमांचे पालन करण्याचे शासनाचे धोरण असून या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत राज्यपाल यांना पत्र पाठवून विनंती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी ठरल्यानुसार नागपूर येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याचे निश्चित करण्यात आले होते, तथापि प्रवास आणि निवास व्यवस्थेदरम्यान संसर्ग वाढू नये यासाठी हे अधिवेशन मुंबईत घ्यावे असे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचे आयोजन

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन – 2022 च्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य शासनाच्या वतीने चहापानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य तसेच लोकभारतीचे कपिल पाटील, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह विधिमंडळ सदस्य उपस्थित होते. तत्पूर्वी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.