Talegaon Dabhade News: मावळातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील 12 हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत

मावळ तालुका इंग्लिश मिडीयम स्कूल असोसिएशनने पत्रकार परिषद घेऊन समस्यांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष

एमपीसी न्यूज – मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात मावळ तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील सुमारे 12 हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. तसेच शाळेतील शिक्षकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे मावळ तालुका इंग्लिश मिडीयम स्कूल असोसिएशनचे कार्याध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले. 

लॉकडाऊन काळात मावळ तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा आर्थिक अडचणीत आहेत. कोरोना काळात मागील पाच महिन्यांपासून शाळा देखील बंद असल्याने अनेक शिक्षक आपल्या मूळ गावी गेल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यातच अपुरे मानधन, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी अतिरिक्त ताण व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून लावली जाणारी कामे अशा अनेक समस्या शिक्षकांना उद्भवत असून त्या प्रशासनापुढे मांडण्यासाठी आज मावळ तालुका इंग्लिश मिडीयम असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेला मावळ तालुका इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे, कार्याध्यक्ष गणेश भेगडे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार प्रकाश ओसवाल, सहसचिव संदीप काकडे, सुरेश चौधरी, गनिमियाँ सिकिलकर, किशोर राजस आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे 10 सप्टेंबरला शहराचा एक दिवसाचा सर्वेक्षण करण्यासाठी सहविचार सभा आयोजीत केली आहे. त्या सभेस येताना शाळेतील शिक्षकांची यादी घेऊन यावे. तसेच सभेस गैरहजर राहिल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे 9 सप्टेंबरला तळेगाव दाभाडे नगरपरिषद उपमुख्याधिकारी यांनी शाळेच्या मुख्याध्यापक यांना पत्राद्वारे कळविले.

त्यामुळे सर्व मुख्याध्यापक सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षण शिकविणा-या शिक्षकांची यादी घेऊन सभेस उपस्थित राहिले. तेथे सभा सुरू झाल्यावर प्रशासनाने मुख्याध्यापकांकडून शिक्षकांच्या याद्या ताब्यात घेतल्या. सभेमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत तळेगाव दाभाडे शहरातील 24 सप्टेंबर रोजी घरोघरी जाऊन नागरीकांची आरोग्याची तपासणी करायची असल्याचे सांगितले, अशी माहिती इंग्लिश मिडीयम स्कूल असोसिएशनने दिली.

त्यानुसार, प्रशासनाने ताबडतोब शिक्षकांच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार केला. त्या शिक्षकांना शासनाच्या उपक्रमाचा मेसेज पाठवण्यास सुरुवात झाली. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश स्वीकारण्यासाठी फोनद्वारे दबाव आणला गेला. त्यामुळे सर्व शिक्षक घाबरले. त्यांनी मुख्याध्यापकांना याबाबत विचारणा केली. आम्ही सदर काम करणार नाही. आम्हाला शाळेचे कोणतेच काम नको, अशी भूमिका त्यांनी घेतली.

मुख्याध्यापकांनी या बाबत आपआपल्या संस्थाचालकांना माहिती दिली. संस्थाचालकांनी 11 सप्टेंबरला समक्ष भेटून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या  उपमुख्याधिकारी यांना व मावळ तालुक्यातील तालुका इंग्लिश मिडीयम असोसिएशनला पत्र देऊन कळविले की इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सध्याच्या शिक्षकांचा स्टाफ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तात्पुरता भरलेला आहे. त्यामुळे कोरोनाबाबत शहराचे सर्वेक्षण करण्यास ते तयार नाहीत. तेव्हा त्या शिक्षकांना सर्वेक्षणाचे आदेश देऊ नये.

याबाबत उपमुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना कळविले. असे असताना देखील प्रशासनाने शहराच्या सर्वेक्षणाच्या एक दिवस आधी सर्व मुख्याध्यापकांना आदेश स्वीकारण्यासाठी फोन करून बोलावले. परंतु मुख्याध्यापक आदेश स्वीकारायला गेले नाहीत. कारण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 95% महिला शिक्षक काम करतात. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बहुतेक शिक्षक आपल्या मूळगावी गेलेले आहेत. ते शिक्षक तेथूनच विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. तसेच हे शिक्षक विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तासिका तत्त्वावर शिकवित असल्यामुळे त्यांना मानधन देखील त्याच पद्धतीने मिळत असते, असे स्पष्टीकरण यावेळी असोसिएशनकडून देण्यात आले.

तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी शासनाच्या 1 मे 2020 या शुल्कवाढ हा अर्धवट जीआरचा फोटो काढून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रकाशित करून फी भरू नये, अशी बातमी देऊन पालकांची दिशाभूल केली. त्यामुळे पालकांनी शैक्षणिक वर्ष 2019-20 ची बाकी फी व नविन शैक्षणिक वर्ष 2020-21 ची फी भरण्यासाठी असमर्थता दाखविली. त्यामुळे पालकांनी फी भरली नाही. तर विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचे मानधन कसे द्यायचे व शिक्षकांनी सर्वेक्षणाचे काम करा म्हणून संस्थाचालकांनी त्यांना आग्रह कसा धरायचा, असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी मावळ इंग्लिश मिडीयम असोसिएशनने पत्रकार परिषदेत केली.

संतोष खांडगे यांनी स्वागत केले. तर संदीप काकडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.