Talegaon Dabhade : रेशनिंग दुकानदारांनी प्रामाणिकपणे अन्नधान्य वाटप करावे : वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज : शासन आदेशानुसार गरजु कुटुंबांना त्यांच्या वाट्याचे अन्नधान्य सवलतीच्या दरात देण्यासाठी तळेगाव दाभाडे शहर परिसरातील सर्व रेशनिंग दुकानदारांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, अशी सूचना उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे शहरातील शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांची त्यांनी भेट घेतली. मावळ तालुक्यातील काही दुकानदार कमी प्रमाणात धान्य वाटप करत असून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने धान्याची विक्री करत असल्याचा तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील 13 दुकानदारांची वैशाली दाभाडे यांनी भेट घेतली. त्यावेळी दाभाडे यांनी धान्य वाटपासंदर्भात त्यांना सूचना केल्या.

याबाबत दाभाडे म्हणाल्या, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सर्वांना बसला आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, या परिस्थितीत कोणीही उपाशी राहणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत.

लॉकडाऊनच्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडूनही कुणीही उपाशी राहू नये, यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा, यासाठी रेशनिंग दुकानदारांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. कार्डधारक आहे. मात्र, लाभार्थी नसलेल्या रेशनिंग कार्ड धारकांची नावे व घरातील संख्या 25 तारखेपर्यंत तहसील कार्यालयात सादर करण्याच्या सूचना सर्व दुकानदारांना केल्या आहेत.

अनेक लाभार्थी आपापल्या घरी बसून आहेत. त्यांच्या हाताला कुठल्याही प्रकारचे काम नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची अडचण त्यांच्या पुढे आहे. अशा गोरगरीब नागरिकांना धान्य मिळाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

 

कुठल्याही शिधापत्रिका धारकांची तक्रार येणार नाही किंवा तो धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये याची जबाबदारी रेशनिंग दुकानदारांनी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग पाळून व सॅनिटायझरचा वापर करुन योग्य पद्धतीने धान्य वाटप करावे. सर्व योजनांची अंमलबजावणी योग्य, पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.  वैशाली दाभाडे : उपनगराध्यक्षा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.