Talegaon Dabhade : सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श म्हणजे यशवंतराव चव्हाण – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे

एमपीसी न्यूज – आजचा महाराष्ट्र पुरोगामी आणि सर्वच क्षेत्रांत प्रगत म्हणून ओळखला जातो, याचे सारे श्रेय निर्विवादपणे यशवंतराव चव्हाण यांना जाते. सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श म्हणजे यशवंतराव चव्हाण होय असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. 
इंद्रायणी महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती कार्यक्रमात मलघे बोलत होते.यावर्षीपासून मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्राच्या वतीने दरवर्षी एक स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्राचार्य डॉ मलघे यांनी दिली.
याप्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयातील यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे समन्वयक प्रा विजय खेडकर, वाणिज्य विभागप्रमुख प्रा संदीप भोसले, मराठी विभागाचे डॉ संदीप कांबळे, प्रा सत्यजित खांडगे, पत्रकार व महाविद्यालयामध्ये एम ए चे शिक्षण घेत असणारे विद्यार्थी प्रभाकर तुमकर, संभाजी हेंद्रे, निलम यादवसह विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डाॅ. मलघे पुढे म्हणाले 12 मार्च 1913 साली सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या यशवंतराव चव्हाणांनी बी ए एल एल बी सारखे उच्च शिक्षण घेतले. महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री,  भारताचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. चिनी आक्रमणाच्या वेळी संरक्षण मंत्री असताना त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आपण विसरू शकत नाही. आदर्श नीतिमूल्य,स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या यशवंतरावांचे कार्य आजच्या तरुण पिढीने लक्षात घ्यावे असे मत डॉ. मलघे यांनी मांडले.
अभ्यासदौरे, कार्यशाळा, परिसंवाद, विविध समित्या यांच्या निमित्ताने देशातील विविध राज्यांना भेटी देणे होते तेव्हा तेथील भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आपण अत्यंत पुरोगामी, प्रगत, उन्नत आहोत आणि आपल्यासाठी  हा रस्ता तयार करण्यात यशवंतराव चव्हाण अग्रणी होते.भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत आपण खूप प्रगत आहोत आणि या प्रगतीचे रोपटे आदरणीय चव्हाण यांनी लावले त्याचा आता मोठा वटवृक्ष झाला असल्याची भावना मलघे यांनी आपल्या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केली.
कृष्णकाठमधील अनेक आठवणी, त्यांचे जीवनकार्याबद्दल महती जागवत सह्याद्रीचे वारे मधील त्यांच्या भाषणातील अनेक संदर्भ डाॅ मलघे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय खेडकर यांनी केले तर प्रा. संदीप कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.