Talegaon Dabhade : गावठाणातील मिळकतीचे ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण

वराळे येथून स्वामित्व योजनेचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – गावाच्या गावठाणातील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे. स्वामित्व योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविला जात असून या स्वामित्व योजनेची सुरुवात शनिवारी (दि. 12) मावळ तालुक्यातील वराळे गावातून करण्यात आली. 
यावेळी आमदार सुनील शेळके, उपअधीक्षक भूमी अभिलेख उर्मिला गलांडे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष, नगरसेवक गणेश खांडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, नगरसेवक सुनिल ढोरे, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायणराव ठाकर, युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, सुनिल दाभाडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, देहू नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, वराळे ग्रामपंचायत सरपंच मनीषा शिंदे, तसेच आजी-माजी सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वामित्व योजनेच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या वतीने प्रत्येक गावाच्या गावठाणातील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून गावठाण क्षेत्र हद्द निश्चिती, नकाशे, मिळकत पत्रिका तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक जागेचा/ मिळकतीचा नकाशा तयार होईल. सीमा निश्चित होतील व मिळकतींचे नेमके क्षेत्र माहित होईल. गावठाणातील प्रत्येक मिळकतीच्या मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) तयार होणार आहे.
तसेच गावठाणातील रस्ते, समाजमंदिरे, नाले इत्यादींच्या सीमा देखील निश्चित होणार आहेत. त्यामुळे विकासकामे करण्यास सुलभता येईल. या योजनेबाबत ग्रामस्थांना असणाऱ्या शंकांचे निरसन संबंधित विभागाचे अधिकारी करणार आहेत. भविष्याचा विचार करून स्वामित्व योजनेच्या दूरदर्शी उपक्रमास सर्व ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.