Pune crime news: मजूर महिलेला कानिफनाथ डोंगरावर नेऊन लुबाडले, आरोपी कर्नाटकमधून अटकेत

एमपीसी न्यूज- काम मिळवुन देण्याचे आमिष दाखवून 45 वर्षीय महिलेला कानिफनाथ डोंगरावर घेऊन जात दगडाने मारहाण करून लुटण्याऱ्याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तत्पुर्वी पोलीसांनी कोंढवा ते वाकड मार्गावरील शेकडो सीसीटीव्हींची पडताळणीकरून हा गुन्हा उघडकीस आणला आहे. त्याला कर्नाटक राज्यातून पोलीसांनी पकडले आहे. सप्टेंबर महिन्यात हा प्रकार घडला होता.

श्रीनिवास गणेश जाधव (वय ३०, रा. वाकड काळेगाव, मुळ. कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी ४५ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिलेला गवत कापण्यासाठी म्हणून आरोपीने कानिफनाथ डोंगरावर नेले होते. तक्रारदार मजूरी करतात. कोंढवा येथील पुरम सोसायटी येथे उभारल्यानंतर त्यांना आरोपीने मजुरी ठरवून नेले होते. परंतु, डोंगरावर गेल्यानंतर त्याने तक्रारदार महिलेच्या डोक्यात दगड घातला. त्यांना गंभीर जखमी करत चाकूचा धाक दाखवून त्यांच्या कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते.

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गंभीर गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यावेळी पोलीसांनी कोंढवा ते वाकड रस्त्यावरील शेकडो सीसीटीव्हीची पडताळणी केली. त्यावेळी आरोपी हा थेरगाव येथील मजूर अड्यावरून कोंढव्यात आला असल्याचे समोर आले होते. त्यानुसार, त्याची माहिती काढली गेली. त्यात त्याचे नाव श्रीनिवास जाधव असल्याचे समोर आले. त्याचा शोध घेत असताना तो त्याच्या मुळ गावी कर्नाटक राज्यातील रायचुर येथे असल्याचे समजले. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी ज्योतीबा पवार व पथकाने त्याला येथून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.