Tata Acquired Air India : वेलकम बॅक एअर इंडिया ! रतन टाटांचे खास ट्वीट

एमपीसी न्यूज – तब्बल 68 वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटा समूहाकडे आली आहे. तोट्यात असलेल्या एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा सन्सने लावलेली सर्वश्रेष्ठ बोली सरकारने स्वीकारली आहे. 68 वर्षांनंतर पुन्हा एकदा एअर इंडिया टाटा समूहाकडे परत आल्याने रतन टाटा यांनी ‘वेलकम बॅक एअर इंडिया’ म्हणत खास ट्वीट केले आहे.

रतन टाटा यांनी एअर इंडियाच्या विमानासोबत जे आर डी टाटा यांचा जुना फोटो शेअर करत भावपूर्ण संदेश लिहला आहे. रतन टाटांनी आपल्या पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की, ‘टाटाने एअर इंडियाची बोली जिंकली ही आनंदाची बातमी आहे. यासोबत एअर इंडिया ला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. तसेच, हवाई क्षेत्रात उद्योगासाठी टाटाला चांगली संधी आहे.’

‘जे आर डी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडिया कंपनीला एक ओळख होती, जगातील सर्वोत्तम विमानसेवा म्हणून तिला गणले जात होते. आपल्या ते वैभव पुन्हा मिळवायचे आहे. यासह आपण सरकारच्या खासगीकरण पॉलिसीचे देखील स्वागत केले पाहिजे,’ असे रतन टाटा यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

दरम्यान, टाटा समूहाने 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने एअर इंडियाची सुरूवात केली होती. त्यानंतर 1953 मध्ये भारत सरकारने ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली. आता 68 वर्षांनंतर टाटा समूहाने 18 हजार कोटी रूपयांची बोली लावत पुन्हा एकदा टाटाची मालकी मिळवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.