Pimpri News : ‘सीसीसी’ सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या 22 खाटा उपलब्ध करणार

एमपीसी न्यूज – कोविड केअर सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास त्यांना रुग्णालयामध्ये ऑक्सिजन खाट उपलब्ध होईपर्यंत वेळ लागतो. त्यासाठी बालनगरी (10), बालेवाडीत (6) आणि घरकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये (6) अशा 22 ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्याकरिता वायसीएम रुग्णालयातील जम्बो सिलेंडरचा वापर केला जाणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे महापालिका, खासगी रुग्णालयातील खाटा कमी पडत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णास कोणत्याही वेळी प्रकृती खालावल्यामुळे कोविड केअर सेंटर अथवा इतर खासगी रुग्णालयामधून ऑक्सिजन, आयसीयू खाटेकरिता वायसीएम किंवा आयसीयू सुविधा असलेल्या मोठ्या रुग्णालयामध्ये स्थलांतरित करावे लागते. परंतु, ऑक्सिजन अथवा आयसीयू खाटाची संख्या मर्यादित असल्याने रुग्णांना अनेकदा खाट उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन खाट तातडीने उपलब्ध न झाल्याने रुग्णाची स्थिती अधिक खालावते.

_MPC_DIR_MPU_II

कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रूग्णांना देखील ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास त्यांना रुग्णालयामध्ये ऑक्सिजन खाट उपलब्ध होईपर्यंत आहे. त्याच स्थितीमध्ये ठेवणे भाग पडते. कोविडची बाधा झालेले रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी आले असता काही रुग्णांना तातडीने ऑक्सिजन उपलब्ध करणे आवश्यक असते. असे रुग्ण संदर्भित करण्यापूर्वी त्यांना त्याच ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध करून दिल्यास भविष्यात उदभवणारी गुंतागुंतीची परिस्थिती टाळणे शक्य होऊ शकते.

त्यासाठी बालनगरी (10), बालेवाडीत (6) आणि घरकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये (6) अशा 22 ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे अत्यावस्थ होणाऱ्या रुग्णांना आयसीयू खाट उपलब्ध होईपर्यंत, त्याठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करता येईल. रुग्णाची स्थिती खालावण्यापासून रोखण्यास मदत होणार आहे. त्याकरिता वायसीएम रुग्णालयातील जम्बो सिलेंडरचा कोविड केअर सेंटरमध्ये वापर केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.