Sangavi Crime News : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे चौघे गजाआड 

4 हजार 800चे रेमडेसिवीर 11 हजारांना

एमपीसी न्यूज – रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सांगवी पोलिसांमार्फत सांगवीत ही कारवाई केली. आरोपीकडून तीन रेमडेसिवीर इंजेक्शनसह चार मोबाईल, एक स्कूटर, असा एक लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी 4 हजार 800 रुपये किमतीचं रेमडेसिव्हीर इंजेक्शन 11 हजार रुपयांना विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

आदित्य दिगंबर मैदगी (वय 24. रा. आंबेडकर चौक, पिंपरी), प्रताप सुनील जाधवर (24, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ), अजय गुरुदेव मोराळे (25, समता नगर, सांगवी), मुरलीधर सुभाष मारुटवकर (24, हायस्ट्रीट होस्टेल, बाणेर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षक भाग्यश्री अभिराम यादव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार औषध किंमत नियंत्रण आदेशातील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य, प्रताप, मुरलीधर आणि अजय चौघांनी बाणेरच्या कोविड सेंटरमधून अवैध मार्गाने रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवली होती. त्या इंजेक्शनचा काळा बाजार करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती.

_MPC_DIR_MPU_II

चौघेजण मिळून एक इंजेक्शन 11 हजार रुपयांना विक्री करत होते. तसेच, डॉक्टरांच्या कोणत्याही प्रिस्क्रीप्शन शिवाय तसेच कोविड तपासणी शिवाय या इंजेक्शनची विक्री करण्यात येत होती.

दरम्यान, सर्वच ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा घेऊन इंजेक्शनची चढ्या दराने विक्री केली जात आहे. काळ्या बाजारात एका इंजेक्शनसाठी दहा ते पंचवीस हजार रुपये मोजावे लागत आहेत.

Sangavi Crime News : रेमडीसेव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे चौघे गजाआड

Sangavi Crime News : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे चौघे गजाआड 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.