Pune News : देशातील पहिला पादचारी दिवस उद्या पुण्यात साजरा होणार

एमपीसी न्यूज – 11 डिसेंबर रोजी पुण्यात पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी पुण्यातील लक्ष्मी रस्ता हा केवळ पादचाऱ्यांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटमधून दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, ‘पादचारी दिवस साजरा करणारं पुणे शहर देशात पहिलं ठरणार आहे.

पुण्यात शनिवारी ‘पादचारी दिन’ पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे महत्त्व समजावे, या उद्देशाने पुणे महापालिकेच्या माध्यमातून शनिवारी (11 डिसेंबर रोजी) पादचारी दिन साजरा करणार आहोत. शनिवारी वाहतुकीसाठी तसेच पार्किंगसाठी लक्ष्मी रस्ता हा पूर्णपणे बंद राहणार आहे.

यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ता असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक सकाळी ११ ते दुपारी ४ या काळात बंद राहणार आहे. पादचाऱ्यांना या रस्त्यावर मनसोक्त फिरत खरेदी करता येणार आहे. तसेच, नागरिकांसाठी विविध कार्यक्रमदेखील आयोजित केले जाणार आहेत. हा रस्ता बंद असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे.

लक्ष्मी रस्त्यावर नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक या चारशे मीटरच्या रस्त्यावर खास पादचाऱ्यांसाठी उपक्रम राबविले जाणार असून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ‘लक्ष्मी रस्ता ओपन स्ट्रीट मॉल’ या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. तसेच, चालण्याचा आनंद या पुस्तिकेचे प्रकाशन होईल. त्यानंतर या रस्त्यावर पथनाट्य, संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये अनेक संस्थांनी सहभाग घेतला आहे.

लक्ष्मी रस्ता सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत केवळ पादचाऱ्यांसाठी खुला असणार असल्याने या मार्गावरील पीएमपी बससेवा, खासगी वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात येणार आहे. या नियोजनासाठी पुणे महापालिकेची वाहतूक पोलिसांसोबत चर्चा सुरू आहे, असे पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.