Weather Update : पुणे शहराचे कमाल तापमान तब्बल 6 ते 7 अंशांनी घसरले

एमपीसी न्यूज : यंदा शहराच्या तापमानाचा पारा 41.8 अंशांवर गेला होता. मात्र, गेल्या चोवीस तासांत शहराचे कमाल तापमान तब्बल 6 ते 7 अंशांनी खाली आले आहे. शनिवारी शहराचे तापमान मे महिन्यातील सर्वांत कमी म्हणजे 32 अंश, तर रविवारी 34 अंशांवर खाली आले होते.

यंदाचा उन्हाळा पुणेकरांना फार जड गेला. कारण, यंदा 15 मार्चपासून उष्णतेची लाट सक्रिय झाली. 15 ते 24 मार्चपर्यंत कमाल तापमानाचा पारा सतत 39 ते 40 अंशांवर होता, तर त्यापाठोपाठ 25 मार्च ते 11 एप्रिल या 17 दिवसांत शहराचा पारा सतत 40 ते 41 अंशांवर होता. मात्र गेल्या चोवीस तासांत अचानक झालेल्या बदलाने शहराचे वातावरण पूर्ण बदलून गेले असून, पुणेकर पाऊस नसूनही पावसाळी हवेचा अनुभव घेत आहेत.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातही उष्णतेची लाट तीव्रच होती. शहरात 30 एप्रिल 1895 रोजी 43 अंश तापमान होते. त्यानंतर 2019 रोजी गेल्या दहा वर्षांतले 42 अंश इतके विक्रमी तापमान नोंदवले गेले. यंदा सलग 22 दिवस शहराचे तापमान 38 ते 41 अंशांवर स्थिर राहिल्याने पुणेकरांची काहिली झाली अन्यथा थोडा उष्मा जाणवला तर पाऊस पडून तो कमी होत असे, मात्र यंदा तब्बल अडीच महिने पाऊस पडलाच नाही. मार्चमध्ये सरासरीच्या उणे 46 टक्के एप्रिलमध्ये उणे 38 टक्के, तर मे मध्ये उणे 33 टक्के पाऊस पडला. म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत शहरात यंदा अवकाळी पाऊस खूप कमी पडल्याने धूप वाढून उष्मा प्रचंड वाढला होता.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून गार वारे सुटले. मात्र, पाऊस पडला नाही. सोमवारीही असेच वातावरण राहील. मात्र, मंगळवार दि.24 पासून ते 26 मेपर्यंत सलग तीन दिवस शहरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.