Thergaon : शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत ‘शासन आपल्या दारी’ अभियान सुरू राहील – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरिकांना योजना व सेवांच्या लाभाचे वाटप

एमपीसी न्यूज – ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून शेवटच्या नागरिकाला विविध योजनांचा लाभ मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

CM : शिवसेना-भाजपची युती एवढी कच्ची नाही, एखाद्या …

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत (Thergaon ) होते.

कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. पुणे जिल्ह्यात २ लाख ८६ हजार २७८ लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले.

आतापर्यंत राज्यात ३५ लाख नागरिकांपर्यंत शासन पोहोचले आहे. १०४ शिबिराच्या माध्यमातून २८६ कोटी रुपयांचा लाभ नागरिकांना देण्यात आला आहे. या अभियानामुळे कोणीही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही.

मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अनेक जनहिताचे निर्णय

मंत्रीमंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, महिला भगिनींसाठी महत्वाचे निर्णय घेतले. ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवास मोफत व महिलांसाठी प्रवास शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयांचा सर्वसामान्य जनतेला लाभ होत आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेनुसार राज्य शासनही ६ हजार रुपये भर घालणार येणार असल्याने १२ हजार इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. राज्यातील १८ हजार कोटी रुपयांच्या २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली, त्यामुळे ६ ते ७ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट निधी देण्याचा आणि सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देता यावी यासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महिला सक्षमीकरणासाठी महत्वाची पाऊले

‘लेक लाडकी लखपती’ ही योजना महिला व मुलींच्या विकासासाठी सुरु करण्यात आली आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनाने बचत गटाच्या उत्पादनांना बाजार उपलब्ध करून देण्याचा आणि फिरता निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल.

राज्यात २ कोटी पेक्षा अधिक महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे. संजय गांधी निराधार योजनेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची मुदत ५ वर्ष करण्यात येईल, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.

राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना

लोकांचे जीवन सुखी, आनंदी करणे आणि त्यांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. म्हणूनच सर्वासामान्य जनतेला केंद्रस्थानी घेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्यात पायाभूत सुविधांचे अनेक मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम स्थानावर असून गेल्या सुमारे ११ महिन्यात १ लाख १८ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार बारणे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनातर्फे जनतेच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न होत आहेत. नागरिकांना शासन आपल्या दारी अभियानांतर्गत एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.