Pune News : पीएमपीतून आजमितीस २ लाखापेक्षा जास्त प्रवाशांना सेवा हे कर्मचा-यांचे यश

एमपीसी न्यूज:  कोरोनाच्या संकटामुळे ओढावलेल्या लॉकडाऊनमध्ये महानगरपालिकांनी पीएमपीच्या कर्मचा-यांना जी कामे सांगितली, ती कामे सगळ्यांनी जबाबदारीने पार पाडली. लॉकडाऊनपूर्वी पीएमपीतून दररोज १० लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये सेवा बंद झाल्याने आर्थिक तुटवडा झाला. आजमितीस पीएमपीतून २ लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असून दररोज ३० लाख रुपये उत्पन्न गोळा होत आहेत, ही संख्या टप्याटप्याने वाढेल असा विश्वास व्यक्त करीत हे पीएमपी कर्मचा-यांचे यश असल्याचे पीएमपीएमएलचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी सांगितले. 

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवात स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात कोरोना काळात मृतदेहांची ने-आण करणारे कर्मचारी, कैलास व येरवडा स्मशानभूमीतील कर्मचारी व पोलिसांचा सन्मान आणि पीपीई किट देण्यात आले.

डॉ.राजेंद्र जगताप म्हणाले, कोविड काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात प्रवाशांची ने-आण करण्यासाठी ३०० बसेस उपलब्ध होत्या. रेल्वेने आलेल्या कामगारांना योग्य स्थळी पोहोचविण्यासाठी देखील रेल्वे स्थानकावरुन पीएमपीने सेवा दिली. पुष्पक आणि रुग्णवाहिकेच्या माध्यमातून देखील काम केले. नेहमीपेक्षा वेगळी सेवा देता आली, याचा आम्हाला आनंद आहे. आता परिस्थिती सुधारत असून लवकरच अधिक चांगली सेवा देऊ, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.