Thergaon Crime News: उलट्या बाजूने क्रिकेट खेळण्यास सांगितल्याने घर मालकाच्या मुलाची भाडेकरुला बॅटने मारहाण

एमपीसी न्यूज – उलट्या साईडने क्रिकेट खेळण्यास सांगितल्याचा राग आल्याने घर मालकाच्या मुलाने भाडेकरुला बॅटने मारहाण केली. त्याचे साथीदारानेही लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.26) रात्री दहाच्या सुमारास थेरगावातील गणपती मंदीरासमोर घडली.

निलेश जगन्नाथ देवळेकर (वय 35, रा. जय भवानीनगर कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोहिदास उर्फ सनी हरिश्चंद्र बोराडे, मंगेश दत्ता खोगरे, सोनु मुन्नासिंग सिकरवार (सर्व रा. थेरगाव) यांना अटक केली आहे.

फिर्यादी निलेश हे थेरगाव येथे भाड्याने राहतात. त्यांच्या घरासमोर त्यांच्या घर मालकाचा मुलगा सनी मित्रांसह क्रिकेट खेळत होता. फिर्यादी निलेश यांनी उलट्या साईडनी खेळा असे सांगितले. त्याचा आरोपींना राग आला. आरोपी सनी हा फिर्यादीच्या डोक्यात बॅट मारायला गेला.

फिर्यादीने हात आडवा केल्याने बॅट डाव्या हाताच्या मधल्या बोटाला व तर्जनीला लागली. त्यामुळे रक्तस्त्राव होऊ लागल्याने फिर्यादी जोरात ओरडले. आजुबाजुचे लोक जमा झाले. पण, आरोपी सनी याच्या हातातील बॅट घेऊन फिर्यादीला वाचविण्यासाठी कोणीही आले नाही. आरोपी मंगेश, सोनु यांनी फिर्यादीस लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.