Chakan News : मोबाईल हिसकावून पळणारे चोरटे दुचाकी स्लिप होऊन आपटले

एमपीसी न्यूज – पादचारी तरुणाच्या हातातून मोबाईल फोन हिसकावून पळवून नेणारे दोन चोरटे त्यांची दुचाकी स्लिप झाल्याने घसरून रस्त्यावर जोरात आपटले. यामध्ये दोन्ही चोरटे जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 7) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास वाघजाईनगर, खराबवडी येथे घडली.

रामेश्वर तारासिंग पवार (वय 27), रंजीत विठ्ठल जाधव (वय 26, दोघे रा. खराबवाडी, चाकण) अशी दुचाकीवरून आपटलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओमकार बबन चव्हाण (वय 19, रा. वाघजाईनगर, खराबवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी चव्हाण हे रस्त्याने पायी चालत जात होते. ते वाघजाईनगर येथील महिंद्रा लॉजिस्टिक कंपनी समोर आले असता एका दुचाकीवरून (एम एच 14 / ई टी 0565) दोन चोरटे आले. त्यांनी चव्हाण यांच्या हातातील एकवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला. मोबाईल हिसकावून पळून जात असताना चोरट्यांची दुचाकी स्लिप झाली. त्यामुळे चोरटे रस्त्यावर जोरात आपटले. यामध्ये दोन्ही चोरटे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.