RTO News : लायसन्स प्रिंटींगची रिबीन संपल्याने हजारो लायसन्स प्रिंटींगच्या प्रतीक्षेत

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) लायसन्स प्रिंटींग करण्यासाठी लागणारी प्रिंटींग मशीनमधील रिबीन संपली आहे. त्यामुळे लायसन्स प्रिंटींग प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरु झाली असून सुमारे दहा हजार लायसन्स प्रिंटींगच्या प्रतीक्षेत आहेत.

आरटीओ कार्यालयातील अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. लायसन्ससाठी अर्ज करण्यापासून ते लायसन्स मिळेपर्यंत सर्व बाबी ऑनलाईन झाल्या असल्या तरी त्यात अद्याप सुसूत्रता आलेली नाही. अनेक तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेकांना आर्थिक भुर्दंड देखील बसत आहे.

एखाद्या व्यक्तीने आरटीओ मध्ये वाहन चालवण्याचा परवाना (लायसन्स) काढला असता त्या व्यक्तीचे लायसन्स त्याच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवले जाते. आरटीओ कार्यालयात लायसन्स प्रिंट केले जाते. त्यानंतर आरटीओ कार्यालयाचा पोस्टमन येऊन प्रिंट केलेले लायसन्स पुणे येथील मुख्य परिवहन कार्यालयात घेऊन जातो.

पुणे येथील मुख्य परिवहन कार्यालयात सर्व लायसन्स पोस्टाने पाठवण्यासाठी पॅक केले जातात आणि नंतर ते पोस्ट ऑफिसमधून नागरिकांच्या पत्त्यावर पाठवले जातात. लायसन्स नागरिकांना स्पीड पोस्टाने पाठवले जातात. त्याचे शुल्क देखील आरटीओ नागरिकांकडून घेते.

स्पीड पोस्टाने एखादे टपाल पाठवल्यास एक ट्रॅकिंग कोड मिळतो. त्या कोडच्या माध्यमातून आपले टपाल कुठपर्यंत आले आहे, याची खातरजमा करता येते. लायसन्स स्पीड पोस्टाने पाठवल्यानंतर पोस्टाकडून आरटीओला हे कोड देण्यासाठी फार उशीर केला जातो, असे आरटीओ मधील एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

पोस्टाचा कोड न मिळाल्याने नागरिकांना त्यांचे लायसन्स कुठपर्यंत आले आहे, त्याला आणखी किती दिवस लागतील याची माहिती मिळत नाही. अनेकांना पोस्टाने वेळेत लायसन्स मिळते. परंतु अनेकांना ते मिळतच नाही. ज्यांना लायसन्स मिळत नाही, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

अनेकांची लायसन्स आणि आरसी बुक या प्रक्रियेत हरवली आहेत. मागील तब्बल पाच-पाच वर्षांपासून ती नागरिकांना मिळालेली नाहीत. लायसन्स हरवल्यास पुन्हा डुप्लीकेट लायसन्स काढण्यासाठी आरटीओत चकरा माराव्या लागतात. त्या प्रक्रीयेसाठी पुन्हा खर्च येतो.

अनेक वेळेला लायसन्स, आरसी बुक नागरिकांना त्यांच्या पत्त्यावर मिळाले नाही तर ते पुन्हा आरटीओ कार्यालयात येतात. मग नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाऊन चौकशी करावी लागते. जर लायसन्स, आरसी बुक आरटीओ कार्यालयात आले असेल तर पुन्हा 50 रुपये दंड भरून ते जमा करावे लागते.

विद्यार्थिनी प्रगल्भा दहातोंडे याबाबत बोलताना म्हणाल्या, आरटीओकडून लायसन्स, आरसी बुक पोस्टाने पाठवले जाते. मात्र अनेकदा ते मिळत नाही. पोस्टाने पाठवण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेला फाटा देऊन थेट आरटीओ मधून नागरिकांना लायसन्स मिळण्याची सुविधा करायला हवी. अथवा पोस्टाने पाठवण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात.

लायसन्स काढण्यासाठी पैसे भरावे लागतात. ते पोस्टाने मिळाले नाही तर आरटीओ मध्ये येऊन पुन्हा चौकशी करावी लागते. आले असेल तर दंड भरून मिळते नाहीतर दुसरे लायसन्स काढण्यासाठी पुन्हा तीच प्रक्रिया करावी लागते, याकडे आरटीओ प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे असल्याचेही प्रगल्भा यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, “सध्या पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्डची अडचण आहे. ती दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.