Pune Crime News : अधिकचे पैसे मागत आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी

दोघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : बांधकाम व्यवसायासाठी घेतलेल्या 30 लाख रुपयांच्या मोबदल्यात 40 लाख रुपये व्याज आणि मुद्दल 30 लाख रुपये देऊनही आणखी 30 लाख रूपयांची मागणी करत आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पुण्याच्या सदाशिव पेठेत हा प्रकार घडला. 

याप्रकरणी एका 35 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली असून आरोपी शशिकांत महादेव गोलांडे (वय 76) आणि निलेश सुरेश देशपांडे (वय 47) यांच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी याने आरोपी शशिकांत गोलांडे याच्याकडून बांधकाम व्यवसायासाठी तीस लाखांचे कर्ज घेतले होते. त्याबदल्यात त्यांनी गोलांडे याला चाळीस लाख रुपये व्याज आणि 30 लाख रुपये मुद्दल परत हि केले होते. परंतु शशिकांत गोलांडे यांनी आणखी तीस लाख रुपयांची मागणी करून फिर्यादी यांना फोनवर धमकी दिली. तसेच फिर्यादी घरी नसताना दुसरा आरोपी नीलेश देशपांडे याला सोबत घेऊन फिर्यादीचे आई-वडिलांना गुंडांची नावे सांगून भीती दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.