Sangvi News: आईचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या तिघा भावांना बेदम मारहाण, एकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – आईचा वाढदिवस साजरा करून घरी जात असताना चार जणांनी मिळून तिघा भावांना बेदम मारहाण केली. तसेच एका भावावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शिवाजी चौकाजवळ रहाटणी येथे घडली.

सम्राट गोरखा असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्यासह आकाश गोरखा, विक्रम नरबहादुर गोरखा (वय 29, रा. पवनानगर, रहाटणी गाव) या दोघांनाही मारहाण झाली आहे. याबाबत विक्रम यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल लोंढे (वय 22), खंडू लोंढे (वय 24), चेंड्या (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही), संदेश (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी फिर्यादी यांच्या आईचा वाढदिवस होता. आईचा वाढदिवस साजरा करून सर्वजण त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या घरासमोरील ओट्यावर आरोपी अमोल लोंढे याने मोठमोठ्याने शिवीगाळ केली. याचा फिर्यादी यांनी आरोपीला जाब विचारला. त्यावेळी सर्व आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या दोन्ही भावांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी अमोल लोंढे याने फिर्यादी यांचा मोठा भाऊ सम्राट गोरखा यांच्या डाव्या हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.