Pune News : 42 कोटी रुपयांच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपुट टॅक्स क्रेडिट घेणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे 42 कोटी 28 लाखाहून अधिक बनावट खरेदी देयकाद्वारे शासनाची 8 कोटी 69 लक्ष रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन त्याद्वारे जीएसटी कररुपातील महसूल बुडविणाऱ्या व्यापाऱ्यास महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने अटक केली आहे.

मे.ओम साई टेड्रिंग कंपनीच्या मालका विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवा कर विभागाकडून बनावट देयकांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत सुशील जग्गुमल जैन या यांना 14 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी या व्यक्तीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कसून शोध घेत आहे. विभागाकडून या आर्थिक वर्षात आतापर्यंत 42 कारवाया करण्यात आल्या आहेत.

अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे मार्गदर्शनाखाली तसेच राज्यकर सह आयुक्त दीपक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली राज्यकर उपायुक्त मनिषा गोपाळे-भोईर, राज्यकर सहायक आयुक्त सतीश लंके, दत्तात्रय तेलंग सचिन सांगळे यांनी कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.