IPL 2021 : आयपीएल सामन्यात पुन्हा ट्विस्ट, प्रेक्षकांनी अनुभवला एकतर्फी ते थरारक सामना

एमपीसी न्यूज : ( विवेक दिगंबरराव कुलकर्णी) या वर्षीच्या आयपीएल मधला पहीलाच सामना तो ही पाच वेळेस ही स्पर्धा ज्यांनी जिंकली त्या बलाढ्य अशा मुंबई इंडीयन्सला हारवून विजयी सलामी देणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा आत्मविश्वास नक्कीच सातवे आसमान पर असणार होता. त्यात नवल ते काय पण विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असला तरी या संपूर्ण स्पर्धेत तो फारसा कर्णधार म्हणून करिष्मा दाखवू शकलेला नाही.

त्यात नाणेफेक जिंकण्याबाबत तो कमालीचा दुर्दैवी आहे, त्यालाच नक्की आठवत नसेल तो शेवटी टॉस कधी जिंकला ते, आजही तेच झाले आणि टॉस जिंकल्याक्षणीच डेव्हिड वॉर्नरने चेन्नईच्या चेपोक वर प्रथम गोलंदाजी स्विकारली आणि विराटने मागच्या वर्षीचा यशस्वी सलामीचा फलंदाज देवदत्त पडीकलच्या साथीने फलंदाजी सुरू केली पण अवघी १९ धावसंख्या असतानाच देवदत्त भूविचा शिकार झाला आणि त्यानंतर 28 धावांची भागीदारी करून शाहबाज अहमद सुद्धा,बाद झाला आणि पाठोपाठ विराट सुद्धा 33 या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला,

त्यानंतर 20/20 च्या फॉरमॅट मधला आजही सर्वोत्तम फलंदाज म्हणून गणला जाणारा डीविलीयर्स सुद्धा बाद झाला आणि 109 वर सहा अशी बिकट अवस्था आरसीबीची झाली, पण कठीण परिस्थितीतही न डगमगता आपल्या नैसर्गिक शैलीत खेळणे ही ज्याची ओळख आहे त्या ग्लेन मॅक्सवेलने घणाघाती आणि स्फोटक फलंदाजी करत आपले वैयक्तिक अर्धशतकही गाठले आणि संघाला 149 या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले, रशीद खानने आपल्या लौकिकानुसार चार षटकात केवळ अठरा धावा देत दोन महत्वपूर्ण बळी मिळवले,

तर दुखापतीतून सावरत खेळणाऱ्या भुवनेश्वरने सुद्धा दोन बळी मिळवून त्याला तोलामोलाची साथ दिली, भुवनेश्वचे फीट असणे ही आपल्या राष्ट्रीय संघासाठी फार आनंदाची बातमी आहे,या दोघांनी केलेल्या कामगिरीवर कळस चढवला तो जेसन होल्डरने तीन बळी मिळवत आरसीबी साठी विराट आणि मॅक्सवेल सोडले तर इतर फलंदाज काहीही विशेष करू शकले नाही. परिणामी 149 ही तशी तुटपुंजी वाटणारी धावसंख्या धावफलकावर उभी राहिली.

खरे तर सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजीतली खोली बघता ही धावसंख्या फार काही नव्हतीच,त्यात वॉर्नर ने नेहमीप्रमाणे आक्रमक फलंदाजी सुरू केली मात्र वृद्धीमान सहा अगदी स्वस्तात बाद झाला आणि आरसीबीच्या गोटात जरासा खुशी की लहर आली पण वॉर्नरच्या मनावर मात्र कसलेही दडपण नव्हते तसेही तो दडपण न घेत आपला आक्रमक खेळ खेळणारा खेळाडू म्हणून क्रिकेटरसिकांना चिरपरिचित आहेच,

त्याने याच लौकिकाला जागत आज फलंदाजी करत आरसीबीला फारशा विजयाच्या आशा दिसणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेत पहिल्या दहा षटकातच 80च्या वर धावा जमवत लक्ष आणखीनच सोपे केले आणि इथूनच सुरू झाला कहाणी मे ट्विस्ट म्हणवणारा खेळ,होय इथूनच अचानकपणे सामना रंगतदार झाला

,खरेतर 20/20 मध्ये कोणीही आणि काहीही भाकीत करू नये म्हणतात,कधीही काहीही होवू शकते आणि अगदी याच समजाला खात्रीत बदलले ते आरसीबीच्या कर्णधाराने,आपला सम्पूर्ण अनुभव पणाला लावत त्याने शब्दशः विजय खेचून आणला

आपण काल बघितले होतेच की अगदी सहज कोलकाता जिंकणार असे वाटत असतानाच शेवटच्या पाच षटकात सम्पूर्ण चित्र बदलले होते पण आज असे काहीही होईल असे वाटतच नव्हते, कारण वॉर्नरचा पूर्ण जम बसला होता आणि त्याला सुयोग्य साथ देताना मनीष पांडेने दुसरी बाजूही लावून धरली होती पण  नियतीच्या मनात मात्र काही तरी वेगळेच होते म्हणूनच जणू कालचीच पुनरावृत्ती आजही झाली

अर्धशतक करून कर्णधार वॉर्नर बाद झाला आणि शाहबाज आहमदने एकाच षटकात तीन बळी मिळवत आरसीबी ला सामन्यात पुन्हा वापस आणले,त्याला हर्षल पटेलने जबरदस्त साथ देत उत्कृष्ट गोलंदाजी करत सामना दोन हाती फिरवला

एक तर चेन्नईच्या मैदानावर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना फलंदाजांची दमछाक होत होती त्यात अचानक आरसीबीची गोलंदाजी एकदमच कडक व्हायला लागली आणि  सनरायजर्स हैदराबादनेही कोलकाता संघाची री ओढली असे वाटावे अशीच फलंदाजी केली ,एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले आणि कोहलीचा काही षटकांपूर्वी चिंताग्रस्त झालेला चेहरा अचानक टवटवीत झाला आणि त्याने गोलंदाजीत अचूक बदल करत आपल्या  संघाची विजयी कामगिरी सुरूच ठेवत सनरायजर्स हैदराबाद संघाला चारीमुंड्या चीत केले

प्रेक्षकांना मात्र कालच्याच सामन्याची क्षणचित्रे पाहत आहोत की काय असे वाटणारा हा सामना सुद्धा अचानकपणे एकतर्फी ते रोमांचकारक असा एखाद्या हिंदी चित्रपटाची कथा असल्यासारखे करून गेला

पण शेवटी विराटच्या झोळीत विजयाचे दान देत हैदराबाद संघाला सहा धावांनी पराभूत करत आपली विजयी मालिका चालूच ठेवली आणि हैदराबाद संघाला आणि त्यांच्या चाहत्याला मात्र निराशेच्या खोल गर्तेत लोटून दिले

दिल्ली विरुद्ध चेन्नई हा एकमेव सामना सोडला तर यावर्षीच्या इंडियन प्रीमियम लीग मधले सर्वच सामने एकतर्फी ते थरारक अशा पद्धतीने झाले आहेत आणि यामुळेच प्रेक्षकांना या स्पर्धेची भुरळ जास्त पडत आहे,नाही का?

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.