New Fire Station : धानोरी व सिंहगड रोड येथे नवीन दोन अग्निशामक केंद्रे कार्यान्वित

एमपीसी न्यूज – पुणे शहराचा (New Fire Station) वाढता पसारा व अग्निशामक दलावरील वाढता ताण पाहता अखेर धानोरी व सिंहगड रोड येथे नव्याने दोन अग्निशामक केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यांचे उद्घाटन आज (सोमवारी) करण्यात आले.

सिंहगड रस्ता येथील लोकमत कार्यालयाशेजारी नव्याने बांधण्यात आलेले कै.दत्तात्रय नवले अग्निशमन केंद्र आजपासून सेवेसाठी कार्यान्वयीत करण्यात आले असून येथे अग्निशामक दलाचे एक वाहन 25 कर्मचारी कार्यारत असणार आहेत. त्यामध्ये तीन शिफ्टनुसार तीन वाहन चालक, प्रत्येक शिफ्टसाठी सात जवान व एक केंद्रप्रमुख अधिकारी म्हणून प्रकाश गोरे कार्यरत असणार आहेत. वडगाव बुद्रुक ते खडकवासला या क्षेत्रासाठू केंद्र कार्यान्वित असणार आहे.

सध्या केंद्राचे बांधकाम पूर्ण झालेले नाही, मात्र पीएमआरडीए अग्निशामक केंद्रावरील वाढता ताण व घटनास्थळी जाण्यासाठी होणारा उशीर बघता तूर्तास एक गाडी व उपलब्ध जवान असे काम सुरु केले जाणार आहे. येत्या दिवाळीपर्यंत केंद्राचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर केंद्र पूर्णपणे सुरु होणे अपेक्षित आहे. त्यावेळी मात्र तीन गाड्या व तसेच 50 जवान केंद्रावर उपस्थित असणे (New Fire Station) अपेक्षित आहे, अशी माहिती नवले अग्निशामक केंद्र प्रमुख प्रकाश गोरे यांनी दिली.

तर दुसरीकडे धानोरी येथे  कर्मयोगी कै. महादु सखाराम टिंगरे अग्निशामक केंद्रही आजपासून कार्यान्वित झाले.याकेंद्रावरही एक गाडी 26 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. येरवाडा केंद्रावरील ताण कमी करण्यासाठी हे केंद्र सुरु केले आहे.यामध्ये धानोरी, लोहगाव, टिंगरेवस्ती व विश्रांतवाडीचा काही भाग या परिसराचा समावेश असणार आहे.

तुर्तास सध्याचे जवान व उपलब्ध गाडी हे या परिसरासाठी पुरेसे आहेत. मात्र, वाढता व्याप पाहिला, तर लोहगावची वाढती लोकवस्ती पाहता तेथेही उपकेंद्र होणे गरजेचे आहे, अशी माहिती टिंगरे अग्निशामक केंद्राचे केंद्रप्रमुख सोपान पवार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.