Vadgaon : तळेगाव दाभाडे, वडगाव, लोणावळा येथे लवकरच 100  बेडचे ‘कोविड केअर सेंटर’ : आमदार सुनील शेळके

100-bed Covid Care Center at Talegaon Dabhade, Wadgaon, Lonavla soon: MLA Sunil Shelke ; कोविड रुग्णांवर उपचार करताना नॉन-कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शहरांसह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. लवकरच तळेगाव दाभाडे, वडगाव, लोणावळा याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधांसह 100  बेडचे ‘कोविड केअर सेंटर’ चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. 

मावळ पंचायत समिती सभागृहात कोरोना सद्यस्थिती संदर्भात आढावा बैठक पार पडली.  त्यावेळी ते बोलत होते.

 बैठकीत  कोरोना सद्यस्थिती, पुढील आवश्‍यक उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी मावळ तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना सद्यस्थितीसह, बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, चाचण्या वाढवण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, ऑक्सिजनयुक्त बेड, व्हेंटिलेटर, कोविड केअर सेंटर इ. विषयी माहिती दिली.

मावळ तालुक्यात शहरांसह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. लवकरच तळेगाव दाभाडे, वडगाव, लोणावळा याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधांसह १०० बेडचे ‘कोविड केअर सेंटर’ चालू करण्यात येणार असल्याचे आमदार  शेळके यांनी सांगितले.

या काळात प्रशासन कोरोना प्रतिबंधासाठी राबवीत असलेल्या उपाययोजना, महत्त्वपूर्ण निर्णय, नागरिकांनी घ्यावयाची काळजी, निर्बंध याची माहिती गावपातळीवर पोहोचवण्यासाठी जनजागृती करुन प्रबोधन करण्यावर भर दिला पाहिजे, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार निर्बंध राबवा. कोविड रुग्णांवर उपचार करताना नॉन-कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये.चांगल्या आरोग्य सुविधा सर्वांना मिळाल्या पाहिजेत.

ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, मेडिकल ऑफिसर यांनी गावनिहाय आढावा घेऊन कोरोना विषाणू संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल, यासाठी योजना तयार करावी, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

एखादा कोरोना बाधित आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची तात्काळ तपासणी करा. तसेच Covid-19 च्या रुग्णांच्या उपचारांबाबत तसेच रुग्णालयातील आवश्यक आरोग्य सोयी सुविधांबाबत महत्त्वपूर्ण सूचना आमदार शेळके यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

नागरिकांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या संकट काळात प्रशासन चांगले काम करीत आहे. नागरिकांनी जागरुकतेने काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करा.

कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम केल्यास या संकटावर आपण नक्कीच मात करु, असा विश्वासही आमदार शेळके यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रांत संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी रवी पवार, तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक झिंजाड, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी सुवर्णा ओगले तसेच तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.