Chikhali News : जलशुद्धीकरण पाणीपुरवठा वीजजोडणीचे काम सुरू

एमपीसी न्यूज – समाविष्ट गावातील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून 267 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी घेतले जाणार आहे.त्यासाठी चिखलीत उभारलेल्या 300 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे.त्यातील 100 दशलक्ष लिटर क्षमतेच्या आंद्रा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून त्यासाठी इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राच्या वीजजोडणीचे काम पूर्ण झाले आहे.चिखली जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजजोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. ते पूर्ण झाल्यावर चाचणी घेतली जाईल. ती यशस्वी झाल्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

महापालिकेच्या माध्यमातून शहराला सध्या पवना धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज 510  दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा केला जातो. तेथून पाणी निगडी सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. तेथून शहरात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पाणी कमी पडत आहे. त्यासाठी आंद्रा धरणातून 100 आणि भाम-आसखेड धरणातून 167  दशलक्ष लिटर पाणी कोटा मंजूर झाला आहे. त्यासाठी चिखलीत 300 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. सप्टेंबरअखेर ते कार्यान्वित करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

त्यामुळे 25 वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या तळवडे, चिखली, मोशी, निघोजे आणि तळवडे येथील इंद्रायणी डुडुळगाव, चहोली, दिघी या गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. भोसरीचा काही भाग आणि प्राधिकरण सेक्टर 1 ते 16 या भागातील पाणीप्रश्नही सुटणार आहे. परिणामी, पवना नदीतून उचलले जाणारे 510 आणि इंद्रायणी नदीतून उचलले जाणारे 100 असे 610 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा नियमित होऊन सर्वांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी महापालिकेने पाण्याची गळती आणि चोरी रोखणे आवश्यक आहे.

महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भामा आसखेड प्रकल्पांतर्गत निघोजे आणि तळवडे येथील इंद्रायणी नदीजवळ उपसा केंद्र येथे पंपिंग मशिनरी उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्पासाठी 22 केव्ही उच्चदाब क्षमतेची वीजजोडणी करण्याचे काम पूर्णत्त्वाकडे आहे. त्यानंतर नदीजवळ उपसा करून पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल. केंद्राचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानंतर पाण्याचे टेस्टिंग सुरू होईल. सर्व तपासणी केल्यानंतर सप्टेंबरअखेरच्या किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शुद्ध पाणीपुरवठा शहराला होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.