Deepak Kesarkar : कौशल्य विकासासाठी आवश्यक सुविधा देणार : दीपक केसरकर

एमपीसी न्यूज – येत्या दहा वर्षांत भारत जगातला सर्वांत तरुण देश म्हणून ओळखला जाणार आहे. त्याचे नेतृत्व आजचे विद्यार्थी करणार आहेत. त्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात केसरकर विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. डीईएसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, शाला समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक पलांडे, प्रा. स्वाती जोगळेकर, शाला प्रमुख सुनील शिवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठी शारीरिक शिक्षण या विषयासाठी सुरुवातीच्या काळात चार ते पाच शाळांमध्ये किमान एक शिक्षक देणे शासनाच्या विचाराधीन आहे. विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्याबरोबर एकाग्रता साधता यावी यासाठी योगाचे विविध प्रकार शिकविण्याची योजना आहे. तसेच आधुनिक तंत्रशिक्षणाबरोबर संगीत, गायन याचे शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी या क्षेत्रांतील नामवंतांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.”

केसरकर (Deepak Kesarkar) पुढे म्हणाले, “नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी आवश्यक साधने पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत शाळांमध्ये उपलब्ध होतील. इयत्ता तिसरीपासून परीक्षा घेता येईल का? याबाबत तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. गृहपाठ स्वयंस्फूर्तिने करायचा अभ्यास आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठाची किंवा खासगी क्लासची गरज भासू नये असे शिक्षण द्यावे. ई-लर्निंग सुविधा राज्यभर पुरविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी वापरण्यास सुलभ सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. भविष्यकाळात शालेय स्तरावर शिक्षण आणि क्रीडा हे दोन्ही विषय सोबत असतील.”

डॉ. के. एच. संचेती, डॉ. प्रमोद चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील नामवंत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. ‘अमृत कलश’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या नाट्यछंद वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. सुनील शिवले यांनी शाळेची माहिती दिली. प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मोहन शेटे यांनी परिचय करून दिला. अ‍ॅड. अशोक पलांडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.