Mumbai Crime News : लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीत 50 फोन व दागिन्यांची चोरी; तक्रारीसाठी रांग

एमपीसी न्यूज – राज्यभर मोठ्या थाटात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. तब्बल दोन वर्षांनी होत असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. मुंबई, पुण्यामध्ये मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईच्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मुंबईत मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरांनी मोठ्या प्रमाणात हातसफाई केल्याचे आता पुढे आले आहे.

राज्यात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन सुरु आहे. मुंबई, पुण्यात तर मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. मुंबईत लालबागच्या राजाच्या गणपतीच्या मिरवणुकीत चोरट्यांनी नुसता धुमाकुळ घातला. या मिरवणुकी दरम्यान जवळजवळ 50 मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि अन्य वस्तु चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी नागरीकांच्या पोलिस ठाण्याबाहेर रांगा लागल्या आहेत.

गेले दहा दिवस लोक दर्शनासाठी रांगा लावत होते, पण आज गणपती बाप्पाला निरोप देताना नागरीकांना पोलिस स्टेशनबाहेर रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. मिरवणकीत चोरीला गेलेल्या वस्तूंची तक्रार देण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात गणेश भक्तांनी गर्दी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.