Chinchwad News : महापालिकेच्या नवीन 13 मजली इमारतीसाठी 550 कोटींचा खर्च; सल्लागाराची नियुक्ती

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमधील सात एकर जागेवर महापालिका भवनाची नवीन 13 मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 550 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इमारतीच्या बांधकामासाठी सल्लागार म्हणून सुनील पाटील अ‍ॅण्ड असोसिएट्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील पिंपरी येथील सध्याची महापालिका भवनाची इमारत कामकाजासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रशस्त इमारत बांधण्याचे नियोजन प्रशासनाने केले. त्यानुसार महिंद्रा कंपनीच्या गांधीनगर, पिंपरी येथील जागेत इमारत बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याचे गटनेत्यांसमोर सादरीकरणही करण्यात आले होते. त्यासाठी एकूण येणा-या खर्चास महापालिका सर्वसाधारण सभेने देखील मान्यता दिली होती. इमारतीची निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली होती.

त्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे आग्रही होते. मात्र, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेची प्रशस्त आणि देखणी इमारत दर्शनी भागात असावी, अशी  सूचना केली. त्यामुळे गांधीनगरमध्ये महापालिका भवन उभारणीचा प्रस्ताव बारगळला. आता, त्या जागेत महापालिकेच्या अग्निशामक दलाचे मुख्यालय उभारले जाणार आहे.

महापालिका भवनासाठी नेहरुनगर, पिंपरी येथील हिंदूस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एच.ए) कंपनीची जागा ताब्यात नसल्याने ते ठिकाणही रद्द करण्यात आले. मोरवाडीतील पुणे – मुंबई जुन्या महामार्गालगतची गरवारे कंपनीची ‘आयटूआर’ अंतर्गत ताब्यात आलेली जागेचीही पाहणी करण्यात आली. मात्र, त्यास पसंती मिळाली नाही.

अखेरीस ऑटो क्लस्टर येथील महापालिकेच्या जागेत महापालिकेची नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हिरवा कंदील दर्शविला आहे. इमारतीच्या बांधकामाचा आराखडा तयार करणे, बांधकाम परवानगी घेणे, स्ट्रक्चरल डिझाइन, सखोल अंदाजपत्रक, निविदा संदर्भात आणि निविदा पश्चात कामे करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

यासाठी 1 जूनला नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. या कामासाठी 4 एजन्सीने दर सादर केले होते. त्यापैकी सुनील पाटील असोसिएट्स यांनी 1.95 टक्के इतका लघुत्तम दर सादर केला. यामध्ये निविदापूर्वी कामासाठी स्वीकृत निविदा रक्कमेच्या 0.50  टक्के तर, निविदा पश्चात कामांसाठी निविदा रकमेच्या 1.45 टक्के एवढे शुल्क देण्यात येणार आहे. या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर, सायन्स पार्क, तारांगण हे महत्वाचे प्रकल्प आहेत. तसेच, या मार्गावर बीआरटीचा प्रशस्त मार्ग आहे. महापालिकेची याठिकाणी 35 एकर जागा आहे. त्यापैकी 7 एकर जागेत 13 मजली प्रशस्त पर्यावरणपूरक इमारत उभारण्यात येणार आहे.

त्यात महापालिकेचे सर्व विभागासह महापौरांसह सर्व पदाधिका-यांची दालने असणार आहेत. तसेच, प्रशस्त सभागृह, मिटिंग हॉल, कॅन्टीन, स्वच्छतागृह आणि इतर अद्यावत अश्या सोयी असणार आहेत. उर्वरित जागेत सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.