Dehuroad Crime News : पती छळ करतो म्हणून साथीदारांच्या मदतीने पत्नीने केला खून; मृतदेहाची लावली विल्हेवाट

एमपीसी न्यूज – देहूगाव परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पती छळ करतो म्हणून पत्नीने तिच्या पाच साथीदारांसोबत मिळून पतीचा खून केला. त्यानंतर पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.

आकाश अशोक गोरखे असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पत्नी ज्योती आकाश गोरखे (वय 19, रा. देहूरोड), तिचे साथीदार सोनी उमेश जेगरे (रा. देहूरोड), रवी धनू राठोड (वय 29, रा. देहूरोड), अक्षय लोंढे (रा. जाधववाडी, चिखली), राम विजय महोतो (रा. पटणा, बिहार), साहिल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार बळीराम चव्हाण यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्यात आकाश गोरखे याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल होती. त्याबाबत देहूरोड पोलीस तपास करीत होते. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बेपत्ता असलेल्या आकाश गोरखे याचा त्याच्या पत्नीने साथीदारांसोबत मिळून खून केला आहे.

आकाश गोरखे हा पत्नी आरोपी ज्योती हिला मारहाण करून छळ करत होता. त्या कारणावरून आरोपी सोनी, ज्योती आणि रवी यांनी आकाशचा खून करण्याचा कट रचला. आरोपी अक्षय, राम आणि साहिल यांनी 30 जानेवारी 2022 रोजी रात्री 11 वाजता आकाश गोरखे याला देहूगाव कमान येथून अज्ञात ठिकाणी नेले. तिथे आरोपींनी आकाशला मारहाण करून त्याचा खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.

बेपत्ता असलेल्या आकाशचा तपास केल्यानंतर पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली. पोलिसांनी पत्नी ज्योती तिचे साथीदार सोनी आणि रवी या तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.