Pimpri : ‘ यापुढे नव्या गृहप्रकल्पांना परवानगी देऊ नका, अनधिकृत नळजोडधारकांवर फौजदारी करा’

भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याची समस्या गंभीर होत असल्याने यापुढे शहरात नवीन गृहप्रकल्पांना परवानगी देण्यात येऊ नये. अनधिकृत नळजोडधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी सूचना भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

आमदार जगताप यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वाढत्या लोकसंख्येमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार 2011 मध्ये शहरातील लोकसंख्या 17 लाख 30 हजार होती. ही लोकसंख्या आज 27 लाख झाली आहे. याचाच अर्थ गेल्या 9 वर्षांत शहराची लोकसंख्या तब्बल 10 लाखांनी वाढली आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागात परवानगीने बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये सुमारे दोन लाख नवीन सदनिका पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. याठिकाणी नागरिक वास्तव्याला आल्यानंतर संपूर्ण शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शहराला अतिरिक्त पिण्याचे पाणी आणण्याचे नियोजन असले तरी, त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी सर्वांना समान पुरविण्यासाठी काही उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे. त्यानुसार शहरात नवीन गृहप्रकल्पांना परवानगी देण्यात येऊ नये.

अनधिृकत नळजोड तोडण्याच्या कारवाईला तातडीने सुरूवात करावी. अनधिकृत नळजोड घेतलेल्या सर्व संबंधितांवर प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे कडक पाऊल उचलावे. अनधिकृत नळजोड घेण्याच्या प्रवृत्तीला कायमचा आळा घालावा. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

शहरातील 1 ते 15 वर्षांपूर्वीच्या अनेक बांधकामांची महापालिकेकडे अद्याप रितसर नोंद झालेली नाही. त्यामुळे महापालिकेचा महसूलही बुडत आहे. अशा बांधकामांची नोंद करून घेण्याची कार्यवाही सुरू करून प्रशासनाने महसूल वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना आमदार जगताप यांनी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.